‘जीव झाला येडापिसा’ ही ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील मालिका संपूर्ण महाराष्ट्रात तुफान गाजली होती. जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यातील शिवा-सिद्धीची जोडी विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘जीव झाला येडापिसा’मध्ये सिद्धीची भूमिका अभिनेत्री विदुला चौगुलेने साकारली होती. आता मालिकाविश्वातील ही लोकप्रिय अभिनेत्री दमदार कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या सिनेमात झळकणार आहे.

अभिनेत्री विदुला चौगुले आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर यांची फ्रेश जोडी आता एका लोकप्रिय चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘सुपर डुपर’.

‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एका बाजूला पारंपरिक कुटुंब तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचं प्रतिनिधित्व करणारी तरुण जोडी अशा भन्नाट आणि विनोदी प्रसंगाची झलक ‘सुपर डुपर’च्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते.

या चित्रपटात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांच्यासह निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते हे कलाकार झळकणार आहेत. एवढ्या भल्या मोठ्या स्टारकास्टमुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर सिनेमा ठरणार आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी शैली आणि विनोदी टाइमिंग या चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार, यात शंका नाही.

दिग्दर्शक समीर आशा पाटील या सिनेमाबद्दल म्हणतात, “नात्यांमधला गोंधळ, प्रेम, राग, आपुलकी आणि भावनिक क्षण यांचा सुरेख संगम ‘सुपर डुपर’मध्ये पाहायला मिळेल. लहान मुलांपासून ते घरातील ज्येष्ठ मंडळींपर्यंत प्रत्येकाला स्वतःचं प्रतिबिंब या कथेत दिसेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

दरम्यान, येत्या ३ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून… उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर याचे प्रस्तुतकर्ता आहेत. ‘सुपर डुपर’ सिनेमाच्या पोस्टरमुळेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून येत्या ३ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होईल.