Jennifer Mistry Talks About TMKOC : मनोरंजन विश्वात अनेकदा पुरुष कलाकार आणि महिला कलाकार यांना मिळणाऱ्या मानधनात, सोयीसुविधांमध्ये तफावत असते, अशा चर्चा अनेकदा केल्या जातात. काही अभिनेत्री तर याबद्दल थेट बोलत असतात. अशातच आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीसुद्धा याबद्दल बोलली आहे.
जेनिफर मिस्त्रीनं अनेक वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमात काम केलं आहे. यामध्ये तिनं रोशन ही भूमिका साकारली आहे. परंतु, निर्माते असित मोदींबरोबरच्या वादानंतर तिनं या मालिकेतून कायमची एक्झिट घेतली. अशातच आता तिनं ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सेटवरचा तिचा अनुभव सांगितला आहे. यावेळी तिनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सेटवर महिला व पुरुष कलाकारांमध्ये भेदभाव केला जातो असं म्हटलं आहे.
जेनिफर मिस्त्रीनं सांगितला अनुभव
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सेटवर कशी वागणूक दिली जायची, असं विचारल्यानंतर जेनिफर म्हणाली, “सुरुवातीचे सहा महिने आम्ही खूप काम केलं आहे. १२ ते १४ तास काम करतो आम्ही. दिशा वकाणी खूप काम करायची. ३० तास वगैरे तिनं काम केलं आहे. असित मोदींची यामध्ये चूक असेल असं मला वाटत नाही, कारण त्यांच्यापर्यंत कदाचित या गोष्टी पोहचतच नसतील. आम्ही जेवायला बसायचो तेव्हा झुरळं असायची, बाथरूम स्वच्छ नसायचं.”
जेनिफर पुढे म्हणाली, “आमच्या रूममध्ये अस्वच्छता असायची. मी आणि सोनालिका जोशी आम्ही घरातून झाडू आणायचो आणि साफ करायचो. आम्ही स्वत: बाथरूम स्वच्छ केलं आहे. या गोष्टी त्यांच्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत. त्यांचं असं होत असेल की या लहान सहान गोष्टींकडे मी लक्ष दिलं तर बाकीचं काम कोण करणार. काही वेळा तर ते दुर्लक्ष करायचे. हे तर खरं आहे की सगळ्यात स्वच्छ व्हॅनिटी व्हॅन पुरुषांना दिली जायची आणि अस्वच्छ व्हॅनिटी व्हॅन महिला कलाकारांना दिली जायची, त्यातही तीन महिला कलाकारांना एक व्हॅनिटी द्यायचे.”
जेनिफर मिस्त्रीनं सांगितला ‘तारक मेहता…’च्या सेटवरचा अनुभव
जेनिफर पुढे म्हणाली, “मी जेव्हा असित सरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले, तूच का बोलत आहेस बाकीचे काहीच बोलत नाही. तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. तेव्हा मला वाटलं की बरोबरच बोलत आहेत ते, बाकीचे कोणीच काहीच बोलत नाहीये; मग मी बोलणं सोडलं. पण, त्यानंतर त्या गोष्टी अजूनच चुकीच्या पद्धतीने घडू लागल्या, तेव्हा मला खूप असह्य झालं. पण, शोमध्ये पुनरागमन झालं होतं, मग शो सोडू शकत नव्हते म्हणून मी विचार केला की चांगले पैसे मिळत आहेत, लोकप्रियताही मिळत आहे, जाऊदे, प्रोडक्शनचा त्रास सहन करते, १५ दिवस तर सेटवर असते १५ दिवस तर घरीच असते. पण, देवाला ते नको होतं म्हणून एका क्षणात त्यानं मला तिथून काढलं. २७ मार्च २००८ मध्ये माझी या मालिकेसाठी निवड झाली. २७ मार्चलाच माझं लग्न झालं आणि २७ मार्च २०२३ मध्येच मी मालिकेतून निरोप घेतला. मी याबद्दल कधी विचारही केला नव्हता. हे सगळं नशीबात लिहिलेलं होतं.”
