Jodha Akbar fame Lavina Tandon Casting Couch : बॉलीवूड, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणाऱ्या कास्टिंग काउचबद्दल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लवीना टंडन हिने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘जोधा अकबर’ या लोकप्रिय मालिकेत रुकैया बेगमची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या लवीनाने जोश टॉकमध्ये तिला आलेल्या दोन भयानक अनुभवांवरून पडदा उचलला. कारकिर्दीच्या एका टप्प्यावर साऊथच्या एका कास्टिंग डायरेक्टरने तिला तडजोड करण्यासाठी लाखो रुपयांची थेट ऑफर दिली होती, असं तिने सांगितलं. या ग्लॅमरस दुनियेचे काळे सत्य सांगताना तिने अशा प्रवृत्तींना कसे चोख उत्तर दिले, याचा सविस्तर प्रसंग शेअर केला आहे.

‘जोधा अकबर’ या लोकप्रिय मालिकेत रुकैया बेगम ही भूमिका साकारून लोकप्रिय झालेली लवीना टंडन हिने जोश टॉकमध्ये आपलं करिअर, आयुष्य, मालिका व ओटीटी अशा बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. “आपली इंडस्ट्री बाहेरून जितकी ग्लॅमरस दिसते, तितकीच ती ‘कास्टिंग काउच’मुळे बदनामही आहे. लोकांना भूमिका मिळतात आणि त्याबदल्यात त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये माझ्यासोबत अशा दोन घटना घडल्या, जिथे मला थेट विचारण्यात आलं होतं की, ‘तू कॉम्प्रमाईज (तडजोड) करणार का?'” असं लवीना म्हणाली.

लवीनाला दिलेली सात लाख रुपयांची ऑफर

लवीना पुढे म्हणाली, “साऊथच्या एका कास्टिंग करणाऱ्या व्यक्तीने मला एका चित्रपटासाठी फोन केला होता. त्याने मला अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, साधारण १० ते १५ किंवा दिवसांचं शूटिंग आहे. यासाठी ५ लाख रुपयांचं बजेट आहे, पण जर तुम्ही कॉम्प्रमाईज करायला तयार असाल, तर ७ लाख रुपये मिळतील. यावर मी त्याला थेट म्हटलं की, माझ्याशी संपर्क साधला आणि इतकं प्रामाणिकपणे थेट बोललात यासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी या सगळ्या गोष्टी करत नाही. जर तुमच्याकडे अशाच प्रकारच्या ऑफर्स असतील तर मला पुन्हा फोन करू नका, पण याव्यतिरिक्त काही चांगलं काम असेल तर नक्की संपर्कात राहा.”

जेव्हा दुसऱ्यांदा आली अशीच ऑफर

लवीना तिच्याबरोबर घडलेल्या दुसऱ्या प्रसंगाबद्दल म्हणाली, “ही घटना अगदी अलीकडचीच आहे. समोरच्या व्यक्तीने मला अगदी सहज सांगितलं की इथे सगळेच असं करतात, तुम्हीही करू शकता. त्यावर माझं पुन्हा तेच उत्तर होतं की, जर मला हे करायचं असतं, तर मी तुम्हाला सरळ ‘हो’ म्हटलं असतं. आणि करिअरच्या या टप्प्यावर आल्यावर मी हे का करू? खरं तर मी आयुष्यात कधीच आणि कोणत्याही टप्प्यावर असं करणार नाही. मनोरंजनसृष्टीत अशा गोष्टी घडतात हे खरंय, पण इथे तुमच्यावर कोणी बळजबरी करत नाही. शेवटी ‘नाही’ म्हणजे ‘नाही’च असतं.”

लवीना टंडनचे करिअर

लवीना टंडनच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, तिने एक बालकलाकार म्हणून करिअर सुरू केलं होतं. २००४ मध्ये आलेल्या ‘तुम बिन जाऊं कहां’ या मालिकेत ती लहान ‘खुशी मेहरा’च्या भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने ‘कभी खुशी कभी धूम’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘दिल मिल गए’ या मालिकांमध्ये काम केलं. मात्र, २०१३ मध्ये तिला ‘जोधा अकबर’ ही मालिका मिळाली आणि या मालिकेतील ‘रुकैया बेगम’ या भूमिकेने तिला घराघरात खरी ओळख मिळवून दिली. सध्या ती ‘अनदेखी 4’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. यात तिने राशी दंगवाल या पोलिसाची भूमिका केली आहे. ही सीरिज सोनी लिव्हवर उपलब्ध आहे.