अभिनेत्री नम्रता संभेराव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावरील या विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या कार्यक्रमातील विनोदवीर प्रसाद खांडेकर यांच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात नम्रता संभेराव महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने प्रसाद आणि नम्रताने अलीकडेच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी नम्रताने हास्यजत्रेच्या शूटिंग दरम्यानच्या असंख्य आठवणी सांगितल्या.
हेही वाचा : थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती चोप्रा पोहोचली सासरी, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष
लॉकडाऊनच्या काळात या कार्यक्रमाचं शूटिंग मुंबईबाहेर दमनमध्ये सुरू होतं. सगळे कलाकार बायोबबलमध्ये शूट करत असताना अचानक सेटवर अभिनेत्रीसाठी फोन आला होता. हा किस्सा अभिनेत्रीने ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. नम्रता म्हणाली, “आमच्या मोटे सरांनी तुझ्यासाठी एका खास व्यक्तीचा फोन आलाय असं मला सांगितलं. त्यानंतर मी फोनवर हॅलो म्हणाले आणि समोरून मी जॉनी लिवर बोलतोय असा आवाज मला आला.”
हेही वाचा : “त्यांनी मला फोन केला अन्…”, शैलेश लोढांचा असित मोदींबद्दल मोठा दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांप्रमाणे…”
नम्रता पुढे म्हणाली, “जॉनी सरांचा आवाज ऐकून मला २ मिनिटं काय घडलं हे कळतंच नव्हतं. जॉनी लिवर सरांना माझ्याशी बोलण्याची इच्छा होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी माझं खूप गाजलेलं ‘लॉली’चं स्किट पाहिलं होतं. माझं ‘लॉली’ स्किट त्या काळात सर्वत्र खूप व्हायरल झालं होतं. तेव्हाच तो व्हिडीओ जॉनी सरांपर्यंत पोहोचला होता. पुढे एके दिवशी ते आम्हाला आमच्या सेटवर भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी माझी हुबेहूब नक्कल करून दाखवली होती.”
“एवढ्या मोठ्या माणसाने माझं स्किट लक्षात ठेवलं हीच माझ्या कामाची पावती होती. ते सेटवर आलेले तेव्हा त्यांनी मला एक गेसचं घड्याळ आणि सोन्याचं पेडंट गिफ्ट दिलं होतं. त्या भेटवस्तू वापरण्याची माझी अजून हिंमत झालेली नाही. माझ्यासाठी ती देवाकडून आलेली गोष्ट असल्याने मी त्या भेटवस्तू जपून ठेवल्या आहेत.” असं नम्रताने सांगितलं. दरम्यान, ‘एकदा तर येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.