Gaurav More New House Johnny Lever Visit Video Viral: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता गौरव मोरे सध्या यशाच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वीच गौरव मुंबईतील पवई परिसरात स्वतःच्या हक्काच्या नवीन घरात राहायला गेला. या घराच्या वास्तू पूजनानंतर आता गौरवच्या आयुष्यात एक अतिशय अविस्मरणीय अशी गोष्ट घडली आहे. बॉलीवूडचे दिग्गज कॉमेडियन आणि अभिनयाचे महागुरु जॉनी लिव्हर यांनी गौरव मोरेच्या नवीन घराला अचानक भेट दिली. गौरवने थेट जॉनी लिव्हर यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. गौरवने या भावनिक क्षणाचा संपूर्ण व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौरव मोरे व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “काय पाऊस लागलाय ना? मजा एकदम. एक सरप्राइज आहे. आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. हे सरप्राइज मला, तुम्हाला सर्वांना आहे. हे सत्यात उतरण्यासाठी मी काहीतरी पुण्य केलं असेल किंवा माहीत नाही.. पण हे पुण्य हे जन्मी आपल्याला लाभणार आहे हे मला खरंच माहीत नव्हतं. काय आहे ते तुम्हाला सांगतो.”

आम्ही धन्य झालो – गौरव मोरे

“प्रिय जॉनी लिव्हर सर, आज आपले पाय आमच्या वास्तूला लागले आणि आम्ही धन्य झालो. आम्हीच काय माझ संपूर्ण घर, येणारी पिढी, मागची पिढी सगळेच सुखावलो. तुमचा सिनेमा पाहता यावा म्हणून केलेली धडपड कधी दारात उभ राहून, तर कधी खिडकीत उभं राहून, आपले सिनेमे बघितले आहेत. आपण आमच्यासारख्या मुलांसाठी एक ऊर्जा आहात, आमचे गुरू आहात. खूप खूप प्रेम सर.. असाच आशीर्वाद असू द्या आमच्यावर,” असं कॅप्शन लिहून गौरव मोरेने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

पुढे व्हिडीओत दिसतं की जॉनी लिव्हर गौरवच्या घरी येतात. गौरव दारातच त्यांना मिठी मारतो. नंतर तो व त्याची पत्नी त्यांचं घरात स्वागत करतात. जॉनी गॅलरीत उभे राहून व्ह्यू बघतात. गौरव मोरे त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. गौरव त्यांना घर दाखवतो. त्याचबरोबर जॉनी लिव्हर त्यांनी आणलेल्या भेटवस्तू गौरव व त्याची पत्नी प्रियांकाला देतात. जॉनी लिव्हर घरातील सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. गौरव खाली बसून त्यांच्याशी बोलत असतो. नंतर गौरवचे कुटुंबीय शाल व टोपीने त्यांचा सन्मान करतात. त्याचबरोबर त्यांना भेटवस्तूही देतात. मग सर्वजण त्यांना सोडायला खाली जातात. नंतर गौरव व प्रियांका त्यांनी दिलेलं गिफ्ट उघडून पाहतात, असं व्हिडीओ पाहायला मिळतं.

गौरव मोरेच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हेमांगी कवीने गौरी तुझा खूप अभिमान वाटतो, अशी कमेंट केली. तर प्रियांकाने जेवायला काय बनवलं होतं, असं शिल्पा शिरोडकरने विचारलं. त्यावर तीच तुम्हाला सांगणार असा रिप्लाय गौरवने दिला. जितेंद्र जोशी, प्रथमेश परब, यशराज मुखाते यांनाही कमेंट्स केल्या आहेत. गौरव तुझा अभिमान वाटतो, खूप प्रगती कर, तुझ्या घरी खूप मोठा माणूस आला, साधी माणसं, जिंकलंस भावा, अशा कमेंट्स या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.