‘स्टार प्रवाह’वर यंदा वटपौर्णिमानिमित्त “महानायिकांची महावटपौर्णिमा” असा विशेष भाग दाखवला जाणार आहे. यानिमित्त वाहिनीवरील विविध मालिकेतील नायिका एकत्र आल्या आहेत. या विशेष भागाचं मालिकेतील नायक, नायिका आणि खलनायिका यांनी एकत्रित चित्रीकरण केलं आहे, त्यामुळे यंदा वटपौर्णिमेला प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहता येणार आहे.
जुई गडकरीने नुकतीच यानिमित्ताने एक मुलाखत दिली आहे. जुई ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली हे पात्र साकारत आहे. यावेळी सायली वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक अंदाजात तयार झाली आहे, तर यावेळी सायलीने घेतलेल्या उखाण्याने लक्ष वेधलं आहे. तिने उखाणा घेत म्हटलं, “वटपौर्णिमेला पूजा होते ते झाड आहे वट, स्टार प्रवाहाच्या सर्व महानायिका उधळून लावणार खलनायिकांचा कट.”
‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’,’लग्नानंतर होईलंच प्रेम’, ‘येड लागलं प्रेमाचं’ यांसारख्या इतर मालिकांमधील नायिकांनी एकत्र येत वटपौर्णिमेनिमित्त या खास भागाचं एकत्रित चित्रीकरण केलं आहे. यावेळी त्यांच्याबरोबर वाहिनीवरील सर्व नायकही उपस्थित असून नायिकांवर आलेल्या संकटापासून ते त्यांच्या पत्नीची कशी रक्षा करणार हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या सीनचं शूटिंग झालं असून, यावेळी सर्व नायक गुंडांशी एकहात करताना दिसले. हा सीन शूट करताना कलाकारांची कशी तारांबळ उडाली, याबाबत त्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.
एकूणच यंदाची वटपौर्णिमाही मालिकाप्रेमींसाठी खास ठरणार आहे. ‘स्टार प्रवाह’वरील त्यांचे सर्व आवडते नायक नायिका त्यांना एका वेगळ्या अंदाजात एकत्र पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे या वटपौर्णिमा विशेष भागात सर्व नायक नायिका मिळून खलनायिकांना कसा धडा शिकवणार हे पाहणं रंजक ठरेल. “महानायिकांची महावटपौर्णिमा” हा विशेष भाग रविवार दुपारी १ वाजता व संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.