मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो पोस्ट करत तिने हा खास दिवस कसा साजरा केला याबद्दल सांगितलं आहे.
जुई गडकरीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिने आतापर्यंत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिची ‘ठरलं तर मग’ ही मालिकासुद्धा चांगली सुरू असून या मालिकेचा प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग आहे. जुई मालिकेच्या शूटिंगमध्ये खूप व्यग्र असते त्यामुळे तिला अनेकदा स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यात आता तिने स्वत:चं यूट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे. अशातच आता तिने या सगळ्याबद्दल सांगत तिच्या वाढदिवसातील फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केलीये. जुईचा ८ जुलै रोजी वाढदिवस होता.
यंदाचा वाढदिवस अनेक चढ-उतारांनी भरलेला होता – जुई गडकरी
वाढदिवस म्हणजे आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण्याची आठवण, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. जुई म्हणाली, “यंदाचा वाढदिवस अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. माझा पहिला व्लॉग अपलोड केला, वाढदिवसासाठीचा ड्रेस घरीच राहिला, दिवसभर एका महत्त्वाच्या कामात व्यग्र होते आणि पाणी साचल्यामुळे वाहतुकीतही अडकले.”
पुढे जुई म्हणाली, “पण या सगळ्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे माझा फोन सतत वाजत होता. कॉल्स, मेसेज, डीएम, पोस्ट्स… तुमच्या प्रेमामुळे मी भारावून गेले. घरातील आणि शूटिंग सेटवरील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ लवकरच माझ्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करणार आहे. माझा पहिला व्ह्लॉग पाहिला का? चॅनेल सबस्क्राइब केलं का? तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद.”
जुईने यावेळी शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोंमधून ती बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचं दिसतं. वाढदिवशी तिने चना मसाला ही भाजी खाल्याचं दिसतं. त्याचा फोटो तिने शेअर केला आहे. यावेळी तिने गुलाबी रंगातील ड्रेसमधील तिचे सुंदर फोटोसुद्धा शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
