Jui Gadkari Birthday Special : ‘ठरलं तर मग’ मालिकेत ८ जुलैच्या विशेष भागात संपूर्ण सुभेदार कुटुंबीय त्यांच्या लाडक्या सायलीला खास सरप्राइज देणार आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या अन्य नायिका सुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहेत. एकंदर ८ जुलैचा दिवस सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीच्या आयुष्यात सुद्धा खूपच खास ठरणार आहे.

जुई गडकरीच्या Reel आणि Real आयुष्यात दोन खास गोष्टी घडणार आहेत. याबाबतची माहिती तिने व्हिडीओ शेअर करत सर्वांना दिली आहे.

जुई गडकरी म्हणाली, “आज व्हिडीओ बनवण्याचं कारण खूपच खास आहे. उद्या माझा वाढदिवस आहे आणि उद्याच्या दिवशी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतील. एक माझ्या Reel लाइफमधली आहे आणि दुसरी माझ्या Real आयुष्यातली…! उद्या मी माझ्या युट्यूब चॅनेलवर माझा पहिला Vlog शेअर करणार आहे. मी ‘श्री खाटू श्याम जी’ यांच्या दर्शनासाठी गेले होते…याचा हा Vlog असेल. सकाळी १० वाजता तुम्हाला हा व्हिडीओ पाहता येईल.”

“दुसरी गोष्ट म्हणजे, सायलीला आता समजलं आहे की, तिच खरी तन्वी आहे आणि हा एपिसोड सुद्धा उद्याच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे डबल सेलिब्रेशन असणार आहे. त्यामुळे प्लीज सर्वांना विनंती आहे की, तुम्ही उद्याचा एपिसोड मिस करू नका…आणि माझा Vlog सुद्धा नक्की बघा.” असं आवाहन जुई गडकरीने प्रेक्षकांना केलं आहे.

दरम्यान, मालिकेतील विशेष प्रसंगाविषयी सांगताना अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “सायलीचं तन्वी असणं हा केवळ कथानकातील ट्विस्ट नाही, तर तिच्या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. हा प्रसंग इतक्या सुंदर पद्धतीने साकारला आहे की शूटिंग करतानाही अनेकदा डोळे पाणावले. प्रेक्षक सायलीवर मनापासून प्रेम करतात. सायली आजारी पडली की तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. हे पाहून कायम भारावून जायला होतं. एका कलाकारासाठी यापेक्षा मोठं बक्षीस असूच शकत नाही. हा क्षण प्रेक्षकांनाही तितकाच भावेल, याची मला खात्री आहे.”

यासाठी ‘स्टार प्रवाह’च्या सगळ्या नायिका पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सखी, नंदिनी, आनंदी, ईश्वरी, जानकी, नुपूर, कृष्णा आणि काव्या या सगळ्याजणी सायलीला सरप्राइज देण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकत्र आल्या आहेत.