मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलासृष्टी हळहळली होती. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्योती चांदेकर त्यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. पूर्णा आजी हे पात्रं संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय झालं होतं. सेटवर सुद्धा त्यांचं सर्वांशी खूप छान बॉण्डिंग झालं होतं.

सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता कुलकर्णी, मोनिका दबडे, सागर तळाशीकर, शिल्पा नवलकर असे सगळेच कलाकार आजही ज्योती ताईंच्या आठवणीत भावुक होतात. मालिकेत पूर्णा आजीची रिप्लेसमेंट झाली असली तरीही ज्योती चांदेकर यांची आठवण आजही क्षणोक्षणी काढली जाते. मालिकेची १००० एपिसोड पूर्ण झाल्यावर जुई म्हणाली होती, “१६ ऑगस्ट २०२५. हा दिवस आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. त्यादिवशी ज्योती ताई आम्हाला कायमची सोडून गेली. तो दिवस नसता आला तर फार बरं झालं असतं. कारण, आम्हा सगळ्यांचं तिच्याबरोबर एक खास बॉण्डिंग होतं. ती सर्वांच्या फार जवळची होती.”

३१ ऑगस्टला ज्योती चांदेकर यांचा जन्मदिवस असायचा, त्यामुळे त्यांच्या आठवणीत आज जुईने सेटवरचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ती लिहिते, “आज आमची म्हातारी ७० वर्षांची झाली असती… सॉरी, म्हातारी म्हणतेय तुला! तू नेहमी स्वतःला “मी अशी मुलगीए” असं म्हणायचीस ना! पण खरंच एनर्जीच्या बाबतीत मुलींनाही लाजवशील अशीच होतीस!! तू खऱ्याअर्थाने “जिंदादिल” होतीस!! Happy Birthday आजी!!! आज खा तुला हवं तितकं गोड! मी नाही ओरडणार!”

जुई गडकरीने शेअर केलेल्या या पोस्टवर ज्योती चांदेकर यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने “सगळ्यात सुंदर माझी आई” अशी कमेंट केली आहे. यासह चाहत्यांनी सुद्धा या पोस्टवर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची रिप्लेसमेंट भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारत आहे. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते. गेली जवळपास चार वर्षे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा आघाडीवर आहे.