माणसाच्या आयुष्यात चढउतार हे येत असतात. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरीला सुद्धा काही वर्षांपूर्वी वैयक्तिक आयुष्यात काही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. आजारपणामुळे तिने मनोरंजनसृष्टीतून सुद्धा ब्रेक घेतला होता. पण, कालांतराने तिने या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण केलं.
जुई गडकरीने ‘अभिजात मराठी ओटीटी’शी संवाद साधताना २० फेब्रुवारी २०२० रोजी तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? याचा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणते, “२० फेब्रुवारी २०२० मधील ही गोष्ट…मी आदल्यादिवशी रात्री जी झोपले ती दुसऱ्यादिवशी सकाळी उठलेच नाही. मला जाग आली तेव्हा मी एका हॉस्पिटलच्या ICU मध्ये होते. आई तेव्हा माझ्या बाजूला बसलेली होती. तेव्हा मी आठ ते दहा तासांसाठी…म्हणजे ती अशी परिस्थिती होती की, मी कोमा स्टेटमध्ये होते. मला तेवढ्या तासांमध्ये काय घडलंय हे आठवतच नाहीये. हे सगळं अचानक झालं होतं.”
जुई म्हणाली, “मी RA Positive ( Rheumatoid Arthritis ) आहे. त्यामुळे तेव्हा माझ्या पिट्यूटरी ग्रंथींमध्ये (पिट्यूटरीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमर) ट्युमर सुद्धा होता. मला त्यादरम्यान Vertigo चे अटॅक सुद्धा यायचे. एकंदर माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. त्यामुळे कोमा स्टेट परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली हे कोणाला आजतागायत माहिती नाहीये. कदाचित देव मला सांगत होता की, तू या सगळ्यावर, स्वत:बद्दल पुन्हा एकदा विचार कर. त्यामुळे आता जे आयुष्य सुरूये ही मी माझी सेकंड इनिंग मानते. या सेकंड इनिंगमध्ये मी मनापासून जगतेय. बरं २० फेब्रुवारीला माझी आई घरी एकटीच होती. तिला समजतच नव्हतं नेमकं काय घडलं…माझ्या शेजारचे काही लोक आले, त्यांनी मला चादरीत घेऊन खाली नेलं आणि तिथून मग रुग्णवाहिकेतून मला नेण्यात आलं होतं. आज सगळं नीट आहे…पण, आयुष्यात तो एक क्षण होता, तेव्हा देवाने मला परत एकदा दाखवून दिलं की, तो माझ्याबरोबर आहे. त्यामुळे माझा देवावरचा विश्वास अजून वाढला.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “रडणं, त्रास होणं…किंवा माझ्याच बाबतीत असं का घडलंय या परिस्थितीतून मी केव्हाच बाहेर पडलेय. आता असं वाटतं, हे इतकं सुंदर आयुष्य आहे, कदाचित हे असं आयुष्य इतरांकडे नसेल. टचवूड म्हणून मी नेहमी म्हणते, देवाची कृपा नेहमी माझ्यावर आहे. I Am God’s Child!”
“आता रोज मी देवाची पूजा करते, त्याच्यासमोर उभी राहून फक्त त्याला थँक्यू म्हणते. मी त्याच्याकडे काही मागत नाहीये…मी फक्त देवाला थँक्यू म्हणते. कारण, ग्रेटफुल असणंही महत्त्वाचं आहे.” असं जुई गडकरीने सांगितलं.
