Jui Gadkari shared a funny marriage proposal incident : जुई गडकरी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’मध्ये सायली ही भूमिका साकारत आहे. सध्या तिच्या या मालिकेत महत्त्वाचं वळण आलं आहे. 

जुई गडकरी या मालिकेत साकारत असलेल्या सायली या पात्राला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता मालिकेत मोठं वळण आलं असून अखेर प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या गोष्टी घडताना आता त्यांना पाहायला मिळणार आहे. असं अभिनेत्रीने ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. याचवेळी तिने तिच्या खासगी आयुष्यासंबंधित एक किस्सादेखील सांगितला आहे.

जुई गडकरी खऱ्या आयुष्यात सिंगल असून तिला अनेकदा लग्नाची स्थळं येत असतात, अनेक जण तिला यासाठी विचारणा करत असतात असं तिने यापूर्वीसुद्धा अनेक मुलाखतींमधून सांगितलं. अशात आता यावेळी तिने एका २५ वर्षांच्या मुलाने थेट तिच्या वडिलांकडेच लग्नासाठी विचारणा केल्याचं म्हटलं आहे. जुई नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

जुई गडकरीला येतात प्रेमपत्र

जुईला याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मॅसेज आणि मेल खूप येतात. काही लोक तर माझ्या आई-वडिलांना घरी पत्र पाठवतात. पाच-पाच सहा पानी प्रेम पत्र. माझ्या बाबांनी मागे एकदा फोनवर मला पत्र वाचून दाखवलं होतं.” या पत्राबद्दल विचारल्यानंतर जुई म्हणाली, “त्यात तुमच्या मुलीशी मला लग्न करायचं आहे. माझं शॉप आहे. कशी मी त्यांची योग्य सून होऊ शकेन वगैरे. असं लिहिलं होतं. विनोदाचा मुद्दा हा होता की तो मुलगा फक्त २५-२६ वर्षांचा होता. म्हणजे काय करायचं नक्की”. 

मुलाखतीत मालिकेत अर्जुन ही भूमिका साकारणारा अभिनेता अमिता भानुशालीने त्यालासुद्धा लोक जुईच्या लग्नाबद्दल विचारतात आणि तो तिच्यासाठी स्थळं शोधत आहे असं म्हटलं आहे. 

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. अर्जुन तुरुंगात असताना तिचं सत्य समोर आणण्यासाठी वाहिनीवरील इतर तेरा नायिका सायलीच्या मदतीसाठी आल्या आहेत. याविषयी जुईने मुलाखतीत सांगितलं की आता कुठलाही वेगळं वलण येणार नाहीये आणि प्रेक्षकांची इच्छा अखेर पूर्ण होणार आहे.