Jui Gadkari shared Future Husband Expectations : मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी आणि या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच रस असतो. त्यात या कलाकारांच्या लग्नासाठी अनेक चाहते उत्सुक असतात. अशीच टेलीव्हिजन विश्वात एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिच्या लग्नाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली अर्थात जुई गडकरी. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला याआधी अनेकदा लग्नाबद्दल विचारलं आहे. “लग्न कधी करणार? कुणाबरोबर करणार?” अशा प्रश्नांसह काही चाहत्यांनी तर तिला लग्नासाठी मागणीही घातली आहे. याबद्दल जुईने अनेकदा भाष्यही केलं आहे.
चाहत्यांच्या प्रश्नांबरोबरच जुईने अनेक मुलाखतींमधूनही तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जुईने वर्षभरापुर्वी सुलेखा तळवलकर यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी जुईला सुलेखा यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या होत्या. यावेळी जुईने तिच्या नवऱ्याविषयीच्या अपेक्षा सांगत असं म्हटलं होतं की, “मला माझ्यासारखाच साधा, सरळ, सोपा, शुद्ध शाकाहारी, देवाचं करणारा नवरा हवा आहे. शिवाय कुटुंब जपणारा हवा आहे. मला जसं कुटुंबात राहायला आवडतं, तसं त्यालाही कुटुंबात रहायला आवडलं पाहिजे.”
यापुढे जुईने सांगितलं होतं की, “याशिवाय मनोरंजन क्षेत्र हे असं आहे. त्यामुळे या क्षेत्राला समजून घेणारा असा व्यवस्थित हवा आहे. माझ्या कुटुंबात खूप शांत आणि संयमी लोक आहेत. ते त्याचे खूप लाड करतील हे नक्की. त्यामुळे त्याने त्यांच्यानुसार सांभाळून घेतलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मला सांभाळून घेणारा हवा. बस्स… याशिवाय माझ्या त्याच्याकडून इतर काही अपेक्षा नाहीत.”
जुईबद्दल बोलायचं झालं तर, सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त ती वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसंच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरील अनेक धमाल-मस्तीचे फोटो व व्हिडीओद्वारे शेअर करताना दिसते.
दरम्यान, स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेमधून जुई प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर जुई ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये झळकली. शिवाय ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.