Jui Gadkari opens up about the struggle behind Tharla Tar Mag’s success : जुई गडकरी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातसुद्धा जुईच्या ‘ठरलं तर मग’चे चाहते आहेत. अशातच आता या मालिकेने ११०० भागांचा टप्पा पार केला आहे.
प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे जुई गडकरी मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने ११०० भागांचा टप्पा गाठला. ‘ठरलं तर मग’ या मालिकेची क्रेझ प्रेक्षकांमध्ये खूप आहे. परंतु, यामुळे मालिकेच्या मेकर्सची आणि कलाकारांची जबाबदारी वाढते आणि त्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कंबर कसून काम करावं लागतं, कुठेही काही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अशातच आता जुईने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत पडद्यामागच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे. मालिकेसाठी कलाकार व मालिकेची संपूर्ण टीम किती मेहनत घेते याबद्दल तिने सांगितलं आहे. याचवेळी जुईने मालिकेच्या शूटिंगमुळे त्यांना २४ तास काम करावं लागतं आणि स्वत:साठी जराही वेळ मिळत नाही असं म्हटलं आहे.
मुलाखतीत मालिकेला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल जुईने त्यांचे आभार मानले. पुढे अभिनेत्री मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या संघर्षाबद्दल बोलली आहे. यावेळी तिने इतकं शूटिंग असतं की त्यांना फेब्रुवरी महिन्यात एकही सुट्टी मिळाली नव्हती आणि ते सलग महिनाभर काम करत होते असं म्हटलं. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
जुईने मानले प्रेक्षकांचे आभार
मुलाखतीत जुईला मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आहेत. सेलिब्रेशन झालंय का असं विचारलं असता ती म्हणाली, “आम्हाला सेलिब्रेशन करायला वेळ नाहीये. खूपच काम आहे. पण, तरी आम्ही आमच्या आमच्यामध्येच जमेल तसं सेलिब्रेशन करत आहोत. पण, ११०० भागांचा टप्पा गाठणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही माझी तिसरी मालिका आहे जिचे १०००हून अधिक भाग झाले आहेत. चार वर्षांपूर्वी मालिका सुरु झालेली आणि ती प्रेक्षकांना खूप आवडतेय ही खूप आनंदाची गोष्ट आहे.”
एकही सुट्टी न घेता महिनाभर केलं काम
मुलाखतीत पुढे जुईला एवढं हेक्टिक वेळापत्रक असताना काहीवेळेला त्याचा प्रकृतीवर परिणाम होतो. तुलासुद्धा पूर्वी असा त्रास झाला होता. त्यामुळे अशावेळी कशी काळजी घ्यावी लागते असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “काळजी तर घ्यावी लागते. पण, वेळ मिळत नाही. आपण जे ७-८ तास झोपलं पाहिज असं म्हणतो, फ्रेश राहिलं पाहिजे. तुम्हाला आराम करता आला पाहिजे. पण, या सगळ्या गोष्टी तितक्या सोप्या नाहीयेत. आम्हाला या गोष्टी नाही करता येत. तुम्हाला एखादा सीन नाही आवडला तर ट्रोल करणं सोपं असतं. पण, दिवसाला ४५ मिनिटांचा एपिसोड देणं आणि हा का देतोय यामागे काही तांत्रिक गोष्टी आहेत. ज्या आम्ही सगळ्यांना नाही सांगू शकत. पण, सगळ्यांचं मनोरंजन करायचं आहे म्हणून सातही दिवस मोठे एपिसोड करत असतो. पण, यामुळे प्रकृतीकडे लक्ष देणं या गोष्टी मागे राहतात.”
जुई याबद्दल पुढे म्हणाली, “आजारी असतानाही आम्ही काम करतो. सेटवर वेळ मिळेल तसा आराम करतो. पण, मालिकेत काम करणं कठीण आहे. हे सोपं नाहीये. कारण तुम्ही ३० दिवस शूट करता. दिवसाला १४ तास शूटिंग करतो, कधी कधी तर २४ तास काम करतो. मागच्या महिन्यात आम्ही २४ तास काम केलं आहे. फेब्रुवारीचा अख्खा महिना आम्ही एकही सुट्टी घेतलेली नाहीये. त्याचबरोबर आम्हाला अवॉर्ड शो वगैरे असतात. सगळीकडे काम करायचं आहे, चांगलंही दिसायचंय, प्रकृतीची काळजी पण घ्यायची आहे. त्यामुळे ही तारेवरची कसरत असते. ही खूप कठीण गोष्ट आहे. मला मान्य आहे की प्रत्येक क्षेत्रात मेहनत असते. पण, आमचा चेहरा दिसत असतो म्हणून आम्हाला काळजी घेणं तारेवरची कसरत असते.”
