स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडण्याचं धैर्य, आपल्या स्वप्नांसाठी उभं राहण्याची ताकद आणि त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणं…‘सनई चौघडे’ मालिकेतील आसावरी म्हणजेच अभिनेत्री जुई गोगरी स्वातंत्र्याबद्दल नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

जुई सांगते, “स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि स्वतःचे विचार निर्भयपणे मांडण्याची ताकद. माझ्यासाठी स्वातंत्र्यता म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं किंवा न घाबरता स्वतःचे विचार मांडणं…. जबाबदारीने वागणं, सगळे निर्णय स्वतः घेणं! खरंतर, मी माझ्या भूमिकांमधून पण हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असते. आपण किती सक्षम आहोत, आपण स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हे मी सतत माझ्या भूमिकांमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि करत राहणार.”

कमळी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा हृषी म्हणजेच अभिनेता निखिल दामले म्हणतो, “गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांमध्ये झालेला एक महत्त्वाचा बदल मला जाणवतोय तो म्हणजे आत्मविश्वास. हाच आत्मविश्वास आता कलाकारांमध्ये, मनोरंजन क्षेत्रात सुद्धा आलेला आहे. पडद्यावर ज्याप्रकारचे विषय आपण मांडत आहोत, सामाजिक म्हणा, इंटरपर्सनल रिलेशनशिप असो…गेल्या काही वर्षांत असे विविध विषय रुपेरी पडद्यावर स्पष्ट अन् अधिक ठामपणे मांडले जात आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे.”

निखिल पुढे म्हणाला, “स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्याची एक संधी आहे असं मला वाटतं. जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य असतं, आपण कोणतेही निर्णय घेऊ शकतो तेव्हा आपल्याकडून खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, आपल्या कार्यक्षमतेला नक्कीच वाढ मिळते असं मला ठामपणे वाटतं.”

स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असला, तरी निखिल दामले, जुई गोगरी यांच्या विचारांमध्ये एक समान धागा दिसून येतो. स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तर त्या स्वातंत्र्यासह येणारी जबाबदारीही स्वीकारणं. याच विचारांसह हे कलाकार यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. स्वातंत्र्याची खरी भावना प्रत्येकाच्या कृतीतून जपली जावी, हाच संदेश त्यांना द्यायचा आहे.

दरम्यान, ‘सनई चौघडे’ ही मालिका झी मराठीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते. तर, ‘कमळी’ मालिका रात्री ९ वाजता ऑन एअर होते.