मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ५ सप्टेंबरला दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मुंबई-ठाण्यातील अनेक भागांमध्ये दहीहंडीचं भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांना बॉलीवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा उपस्थिती लावली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील मालिकांच्या सेटवर सुद्धा सध्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

‘सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत एक रंजक वळण आलेलं पहायला मिळतंय. धैर्य व सावी या दोघांना घराबाहेर काढलं आहे. दोघंही घर खर्चासाठी पैशांची तडजोड करत असतात. अशातच घराच्या आवारात दहीहंडीची स्पर्धा पार पडणार असल्याचं कळतं आणि धैर्य त्यात सहभागी होतो. धैर्य दहीहंडी फोडायला जातो, पण त्याला चक्कर येते आणि तो खाली पडतो. पण धैर्यने दिलेला शब्द मोडायचा नाही, म्हणून सावी स्वतः दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेते.

दहीहंडीच्या या भागाबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, “माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. मला उंचीची खूप भीती वाटते आणि मी आयुष्यात कधीच हंडी फोडली नव्हती. पण, सेटवर खरंच थरावर थर रचून दहीहंडी बांधली होती. मला सेफ्टी बेल्ट बांधून वर पाठवलं होतं, पण वरून खाली बघितल्यावर मी खूप घाबरले. सगळे थर खाली पडल्यावर मी वर एकटीच लटकत होते, त्यामुळे तर मला अजूनच भीती वाटली. मात्र, आमचे दिग्दर्शक आणि तिथे आलेल्या गोविंदा पथकाने मला खूप धीर दिला. शेवटी मी ती हंडी फोडलीच. स्वतःच्या भीतीवर मात करून काहीतरी वेगळं करायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. हा माझ्या आयुष्यातला एक खूप खास आणि कधीही न विसरता येणारा अनुभव होता.”

पुढे ती म्हणाली की, “यापूर्वी नेहमीच दहीहंडीचा तो उत्साह पाहण्यासाठी मी जायचे. पण मी कधी हंडी फोडेन हा विचार केला नव्हता. ज्या क्षणी मी अगदी शेवटच्या थरावर चढले त्यावेळी मला प्रत्येक गोविंदाबद्दल कौतुक वाटलं, त्यांच्या निर्धास्तपणाला माझ्याकडून सलाम आहे. सर्व गोविंदा पथकांना इतकंच सांगेन खूप धमाल करा पण स्वतःच्या जीवाला जपा. हा सण उत्सव म्हणून साजरा करूयात स्पर्धा म्हणून नको. आणि तुमची लाडकी सावी कशी दहीहंडी फोडणार आहे हे पाहायला विसरू नका.”

दरम्यान, ‘जुळली गाठ गं’ ही मालिका सन मराठीवर दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.