Kadambari Kadam Skincare: अभिनेत्री कादंबरी कदमने नुकतीच ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. १ जानेवारी २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या सिनेमाने जवळजवळ दोन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
कांदबरी कदमबरोबर या सिनेमात प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, हरिश दुधाडे, सचिन खेडेकर, अनंत जोग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
कादंबरी कदम चित्रपटांसह नाटकाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. चारचौघी या गाजलेल्या नाटकात ती महत्वाच्या भूमिकेत दिसली. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिचे स्कीन केअर रुटिन काय असते, चेहरा व्यवस्थित दिसावा यासाठी ती काय व्यायाम करते, याबद्दल तिने सांगितले आहे.
“कुठल्याही गोष्टीचा राग…”
काही दिवसांपूर्वी कादंबरी कदमने लोकमत सखीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत स्कीन केअर रुटिनबद्दल ती म्हणाली, “माझं असं खूप छान स्कीन केअर रुटिन नाही. पण, काही गोष्टी मी पाळते. ज्यामध्ये अर्थातच पाणी खूप पिणे, कमीत कमी मेकअप वापरणे अशा गोष्टी मी करते.”
पुढे ती म्हणाली, “काही चेहऱ्याचे व्यायाम असतात. जे दररोज करावेत. आता सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. तर चेहऱ्याचे कोणते व्यायाम आपण करू शकतो, हे त्यावरुन जाणून घेता.”
कादंबरी असेही म्हणाली, “सगळ्यात महत्वाचे म्हणजे तणावमुक्त राहा. कुठल्याही गोष्टीचा राग करू नका. मोठा श्वास घ्या. गोष्टी सोडून द्या. आनंदी राहा. कारण तुमची मनस्थिती काय आहे, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते”, असे म्हणत कादंबरी कदमने ती चेहऱ्याची कशी काळजी घेते, याबद्दल वक्तव्य केले.
कादंबरीच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्रीने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. भूमिका, हॅपी व्हॅलेंनटाईन, दिल की पुकार, फेरा, लंपन, अजिंक्य, पटलं तर घ्या, अवघाची संसार, रेडिओ नाईट्स ६.०६, आघात, इंद्रधनुष्य, तुला शिकवीन चांगलाच धडा, थ्री ऑफ अस, क्षणभर विश्रांती, तुजवीण सख्या रे, ही पोरगी कोणाची, मंगलाष्टक वन्स मोअर अशा विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे.
कादंबरीला तुजवीण सख्या रे या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिने राधिका ही भूमिका साकारली होती.
दरम्यान, अभिनेत्री आता आगामी काळात कोणत्या भूमिकेत दिसणार, कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
