Zee Marathi Kamali : गेल्या काही दिवसांपासून कमळीच्या महानिकालाची सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. कमळीला परीक्षेत किती टक्के मिळणार? अनिका ऐनवेळी बाजी मारणार का, तिची कटकारस्थानं यशस्वी होतील का? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले होते. अखेर या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळालेली आहेत. कमळी आयुष्यात यशस्वी होण्याचं मोठं स्वप्न उराशी बाळगून आपल्या छोट्याशा गावातून मुंबईला आलेली असते. त्यामुळे अनिकाने कितीही अडथळे निर्माण केले तरी, आपण पास व्हायचं असा निश्चय कमळीने केलेला आहे.

अपेक्षेप्रमाणे कमळी परीक्षा देत असताना अनिका अनेक अडथळे निर्माण करते. यामध्ये तिला कामिनीची साथ लाभते. इतकंच नव्हे तर कॉलेजमधून कोणीही कमळीच्या मदतीसाठी पुढाकार घेणार नाही याचाही बंदोबस्त अनिकाने केलेला असतो. पण, ऐनवेळी अन्नपूर्णा आजीमुळे कमळीला परीक्षेचा पेपर लिहायला मिळतो.

कोणीही, कितीही, काहीही केलं तरी अंतिम परीक्षेत मीच बाजी मारणार असा अनिकाचा अतिआत्मविश्वास असतो. तिचा हाच भ्रमाचा भोपळा आता फुटलाय.

कमळी मेहनत, संघर्ष करून मोठ्या जिद्दीने मुंबई विद्यापीठातून पहिली आलीये. प्रथम क्रमांक पटकावत तिने महानिकालात बाजी मारली आहे. शिक्षणमंत्री तिचा सत्कार करतात, यावेळी कमळीची भावी सासुबाई नयनतारा देखील उपस्थित असते. कमळीचा कौतुकसोहळा पाहून तिचा चेहरा काहीसा पडतो. कारण, आता पुन्हा एकदा हृषी कमळीकडे खेचला जाणार अशी भीती तिच्या मनात निर्माण होते.

कमळीला या परीक्षेत 96.40%टक्के मिळाले आहेत. तिची मेहनत सफल झाली असून, कोल्हापूरची लेक शहरातल्या कॉलेजमध्ये पहिली आल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला.

कमळी मालिकेत आणखी एक सकारात्मक गोष्ट घडलीये. अन्नपूर्णा आजीला अधिकमासाचं व्रत पूर्ण करताना चक्कर येते. यावेळी कमळी आजीला सावरते आणि तिचं व्रतही पूर्ण करते. यामुळे या आजी-नातीच्या जोडीची मोठ्या गैरसमजानंतर अखेर दिलजमाई झाली आहे. याशिवाय मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. हृषी कमळीच्या प्रेमात असतो हे सर्वांनाच माहितीये पण, आता कमळीच्या मनात सुद्धा हृषीबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण होतील. तिलाही प्रेमाची जाणीव होईल.

आता या सगळ्यानंतर अनिका, कामिनी आणि रागिणी पुढे काय करणार? महत्त्वाचं म्हणजे कमळीची आई सरोज ( गौरी ) तिच्यासमोर केव्हा येणार? राजनला सत्य केव्हा समजणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ही मालिका रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.