Kamali Marathi Serial : कमळी मुंबई विद्यापीठातून पहिली येते आणि ही आनंदाची बातमी आई अन् आबांना सांगण्यासाठी ती त्याच दिवशी तिच्या गावी निघते. कमळीला गावी पोहोचल्यावर मोठा धक्का बसतो. कारण, जवळपास एक वर्ष आबांच्या निधनाचं सत्य तिची आई तिच्यापासून लपवून ठेवते. आबांच्या निधनानंतर कमळी मुंबईला जाणार नाही, ती गावीच राहील यामुळे तिच्या शिक्षणात अडथळा निर्माण होईल, असं तिच्या आईला वाटत असतं. अर्थात कमळीच्या आईचा हा अंदाज अगदी योग्य ठरला आहे.

आपले लाडके आजोबा आता या जगात नाहीत हे समजल्यावर कमळी प्रचंड खचते. ती एकटी पडते, आबांना आयुष्यात पुन्हा कधीच भेटता येणार नाही याचं दु:ख तिला होत असतं. याच सगळ्याचा विचार करताना कमळी खरंच गाव सोडून जाण्यास नकार देते. तिला आता पुन्हा मुंबईला जाण्यात काहीच रस नसतो. पण, यामुळे शिक्षण पुन्हा एकदा थांबणार…त्यामुळे हा चुकीचा निर्णय घेऊ नकोस असं निंगी तिला बजावून सांगत असते. मात्र, कमळी कोणाचंही ऐकत नाही. शेवटी आता कमळीची मनधरणी करण्यासाठी हृषी कोल्हापुरला जाणार आहे.

कमळीची मानसिक अवस्था बिकट असेल आणि यातूनच ती चुकीचा निर्णय घेणार याची हृषीला जाणीव असते. त्यामुळे आता तो स्वत: तिला परत आणण्यासाठी कोल्हापुरला पोहोचला आहे. कमळी हृषीला सांगते, “मी आता माझं गाव सोडून कुठेही जाणार नाही.”

कमळीचा हा निर्णय ऐकून हृषी सुद्धा एक निश्चय करतो. तू गाव सोडून जाणार नाही तर, मी सुद्धा इथेच राहणार. हृषी तिला म्हणतो, “आता माझं हे गावी राहण्याचं खूळ तेव्हाच जाईल… जेव्हा तू माझ्याबरोबर मुंबईला येशील!”

“कमळीला मी मुंबईला घेऊन जाणार आणि तिच्या स्वप्नांना पंख द्यायला मी मदत करणार…तेही माझ्या प्रेमासोबत!” असा निश्चय हृषीने केला आहे. आता कमळीच्या गावात हृषी सगळी कामं करणार आहे. तो शेतात देखील कष्ट करताना दिसेल. याशिवाय हृषीने स्वत:चा लूकही बदलला आहे. तो कमळीच्या गावात मॉडर्न न राहता अगदी सामान्य गावकऱ्यांप्रमाणे राहणार आहे. आता हृषीवर इम्प्रेस होऊन कमळी पुन्हा मुंबईला केव्हा येणार? आणि हृषीबद्दल तिच्या मनात प्रेमाची भावना केव्हा निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘कमळी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये विजया बाबर, निखिल दामले, इला भाटे, आशा शेलार, केतकी कुलकर्णी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.