Marathi Actor Adhokshaj Karhade Blessed With Baby Boy : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेने चाहत्यांबरोबर एक आनंदाची शेअर केली आहे. अभिनेत्याच्या घरी साधारण महिन्याभरापूर्वी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला असून त्याला पुत्ररत्न झालं आहे. ही गुडन्यूज अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. अधोक्षजने मुलगा झाल्याची आनंदाची बातमी शेअर करताच संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
अधोक्षजला १० फेब्रुवारी २०२६ रोजी मुलगा झाला. बाळाच्या जन्मानंतर एक महिन्याने अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. अधोक्षजच्या बाळाचं अजून बारसं झालेलं नाहीये. पण, मुलाचं पाळण्यातलं नाव काय ठेवलंय याचा खुलासा अभिनेत्याने पोस्ट शेअर करत केला आहे.
अधोक्षज लिहितो, “चिरंजीव आले! १० फेब्रुवारी २०२६… माझ्या आई-बाबांच्या लग्नाच्या ४१ व्या वाढदिवशी ते पुन्हा एकदा आणि चैतालीचे आई-बाबा पहिल्यांदा आजी-आजोबा झाले!….तसेच चैताली आणि मी आई-बाबा झालो! आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? याची…तर, त्याचं नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण नाव आहे. बारसं झालं की सगळ्यांना सांगेनच. पण सध्या पाळण्यातलं नाव “नारायण” ठेवलं आहे! शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या!”
अधोक्षजने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दिशा परदेशी, अमृता देशमुख, स्पृहा जोशी, पियुष रानडे यांनी कमेंट्स करत अधोक्षजला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अधोक्षज कऱ्हाडे हा लोकप्रिय अभिनेता व कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे. त्यामुळे आता संकर्षण सुद्धा काका झाला आहे.
अधोक्षजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हृषीचा मोठा भाऊ रोहित इनामदारची भूमिका अधोक्षज साकारतोय. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
