अलीकडच्या काळात अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराने चांगली पोस्ट शेअर केली असली तरी उगाच त्याला ट्रोल केलं जातं. यामुळेच अनेक कलाकार सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात. पण, काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सना वेळीच सडेतोड उत्तर देत त्यांचा समाचार घेतात. ऐश्वर्या नारकर, जुईली जोगळेकर, मिताली मयेकर या अभिनेत्री निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना जिथल्या तिथे स्पष्ट उत्तरं देतात. असाच एक स्क्रीनशॉट ‘कमळी’ मालिकेतील अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये संबंधित युजरने केतकीच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ मालिका आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला असतो. आता या मालिकेतील कलाकार देखील चर्चेत आहेत. यामध्ये अनिका महाजन हे खलनायिकेचं पात्र अभिनेत्री केतकी कुलकर्णी साकारत आहे.
केतकीचं पात्र मालिकेत निगेटिव्ह असलं तरी खऱ्या आयुष्यात तिने गेल्या काही महिन्यांमध्ये लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र, अलीकडेच केतकीच्या विविध पोस्ट्सवर एका अकाऊंटवरून निगेटिव्ह कमेंट्स केल्या गेल्याचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
केतकीच्या पोस्टवर असंख्य निगेटिव्ह कमेंट्स एकाच विशिष्ट इन्स्टा युजर आयडीवरून करण्यात आल्या आहेत. “हे काय कपडे घातलेस…तुला थोडी लाज वाटली पाहिजे”, “जर चांगले कपडे घातलेस तर तुला सगळे लाइक करतील”, “तू नको काळजी करूस कमळी आहे तुझं लग्न मोडायला”, “कमळीचा जीव घेण्यासाठी तू समोशात काय टाकलं होतंस? तुझ्या ग्रॅनी आजीने सगळं केलंय ना”
या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर करत केतकी कुलकर्णी लिहिते, “काही लोकांना पात्र आणि व्यक्ती यामधील फरकच कळत नाही. हे गंमतीशीर आहे. अभिनय फक्त अभिनय म्हणून पाहिला तर तो अधिक छान एन्जॉय करता येईल.”

दरम्यान, केतकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर बालपणापासूनच तिने इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान ती अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये झळकली. आता केतकी ‘कमळी’ या सुपरहिट मालिकेत अनिका ही भूमिका साकारत आहे.

