Kamali Fame Actress Sai Kalyankar Blessed With Baby Girl : ‘कमळी’ मालिकेत राधिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सई कल्याणकरने नुकतीच तिच्या सर्व चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सई कल्याणकर आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडलं होतं. आता अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. सईला १० मार्च २०२६ रोजी मुलगी झाली. बाळाच्या जन्मानंतर १४ दिवसांनी अभिनेत्रीने ही गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली आहे. सईने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या बाळाच्या चिमुकल्या हातांची झलक पाहायला मिळतेय.

“आमच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. १० मार्चला आम्हाला मुलगी झाली. आता एका नव्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे.” असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे.

सईने आई झाल्याची गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘कमळी’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री विजया बाबरने या पोस्टवर ‘सई आई’ अशी गोड कमेंट केली आहे. याशिवाय कुजिंका काळविंटसह अनेक मराठी कलाकारांनी सईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Award Banner

सई कल्याणकरबद्दल…

सई कल्याणकरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लग्नानंतर ४ वर्षांनी आई झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ती लग्नबंधनात अडकली होती. तिच्या पतीचं नाव आहे प्रशांत चव्हाण. अभिनेत्रीच्या पतीने नॅनो केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे. सईने आजवर ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय सईच्या ‘कमळी’ मालिकेतील भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये ती राधिकाची ( हृषीची वहिनी ) भूमिका साकारत आहे. गोड, निरागस आणि कायम सर्वांना समजून घेणारा राधिकाचा स्वभाव आहे. आता सई कल्याणकर ‘कमळी’ मालिका सोडणार की ब्रेकनंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार हे थोड्याच दिवसांत प्रेक्षकांना समजणार आहे. या मालिकेत विजया बाबर, इला भाटे, निखिल दामले, आशा शेलार, केतकी कुलकर्णी असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत.