‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ मालिका आणि यामध्ये झळकणारे सगळेच कलाकार अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम आघाडीवर असते. यामध्ये विजया बाबर, इला भाटे, निखिल दामले, आशा शेलार, केतकी कुलकर्णी असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत. या मालिकेतील एका अभिनेत्रीने अलीकडेच चाहत्यांना आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती.

मालिकेत राधिका ( हृषीची वहिनी ) ही भूमिका अभिनेत्री सई कल्याणकर साकारत आहे. गोड, निरागस आणि कायम सासूबाईंच्या धाकाखाली वावरणारी राधिका प्रत्येकाला आवडते. काही दिवसांपूर्वीच सईच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला होता. यावेळी अभिनेत्रीकडे गुडन्यूज असल्याचं सर्वांसमोर समजलं होतं. आता सईने सेटवरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी शूटिंग करताना तिला पाचवा महिना सुरू होता आणि तेव्हा पहिल्यांदाच तिला आपल्या पोटात बाळाची हालचाल जाणवली होती.

सई कल्याणकर मातृत्वाबद्दल लिहिते, “माझा प्रेग्नन्सीचा प्रवास…पाचवा महिना. जेव्हा पहिल्यांदा मला बाळाची चाहूल लागली तो क्षण….त्याची हालचाल जाणवली. ती भावना, तो अनुभव मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही…ते कायम मी माझ्या मनात साठवून ठेवेन.”

सईने या दिवशीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच सईचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडलं होतं. तिच्या डोहाळेजेवणाला सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान आणि तन्वी बर्वे या अभिनेत्री उपस्थित होत्या. या अभिनेत्रींनी एकत्र ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत काम केलं होतं. या सगळ्यांची मैत्री अजूनही कायम आहे.

सई कल्याणकरबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या पतीचं नाव आहे प्रशांत चव्हाण. अभिनेत्रीच्या पतीने नॅनो केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे. सईने आजवर ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता सई कल्याणकर ‘कमळी’ मालिका सोडणार की ब्रेकनंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार हे थोड्याच दिवसांत प्रेक्षकांना समजणार आहे.