Kamali Fame Vijaya Babar : झी मराठीवरील ‘कमळी’ मालिका सुरुवातीपासूनच प्रेरणादायी कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मेहनत, संघर्ष करून कमळी मोठ्या जिद्दीने मुंबई विद्यापीठातून पहिली आलीये. प्रथम क्रमांक पटकावत तिने पहिल्या वर्षाच्या महानिकालात बाजी मारली आहे. या परीक्षेत कमळीला 96.40%टक्के मिळाले आहेत. तिची मेहनत सफल झाली असून, कोल्हापूरची लेक शहरातल्या कॉलेजमध्ये पहिली आल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कमळीचा हा निकाल जाहीर करण्यासाठी ‘शुभ श्रावणी’ मालिकेतील विश्वंभर राजशिर्के आले होते. निकाल लागल्यावर शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते तिचा सत्कार केला जातो.
या ट्रॅकविषयी बोलताना कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, “कमळीसाठी हा खूप मोठा आणि भावनिक क्षण आहे. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी तिचा संघर्ष पाहिला आहे. घर सोडून शिक्षणासाठी नवीन शहरात येणं, अनेक अडचणींवर मात करणं आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं, हा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यामुळे ९६.४०% गुण मिळवण्याचा हा क्षण फक्त कमळीचाच नाही, तर तिच्यासह हा प्रवास अनुभवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचाही आहे. कमळीच्या मोठ्या स्वप्नाची ही फक्त सुरुवात आहे. तिच्या कथेतून अनेक तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.”
या प्रसंगाच्या चित्रीकरणाने विजयालाही तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली. तिने BMM मध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. याबद्दल विजया म्हणाली, “हा सीन करताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आमच्यावेळी टक्केवारी ऐवजी सीजीपीए पद्धत होती. मी ‘बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM)’ केलं आहे. मला १० पैकी ८ -८.५ CGPA मिळाले होते. तसेच दहावी आणि बारावीमध्येही मला ८० ते ८१ टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी असं काही मोठं सेलिब्रेशन झालं नव्हतं, पण माझ्या आयुष्यात काही चांगलं घडलं की, मी सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जाते. त्यामुळे हा सीन करताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.”
कमळीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा तिच्या पुढील प्रवासाची नवी सुरुवात ठरणार आहे. तिची जिद्द, मेहनत आणि शिक्षणावरील विश्वास प्रेक्षकांना पुढेही प्रेरणा देत राहणार आहे. ही मालिका दररोज रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.
