चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंताच्या आगमनाचा हा मंगलमयी सण संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घराघरांत गुढी उभारून, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. याशिवाय अलीकडची तरुणपिढी, मराठी कलाकार एकत्र शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करतात.
यंदा ‘झी मराठी’च्या विविध मालिकांमधील कलाकारांनी सुद्धा खास पद्धतीने हा सण साजरा केला. ‘कमळी’ म्हणजेच अभिनेत्री विजया बाबरने गुढीपाडव्याबद्दलची खास आठवण यावेळी सांगितली आहे.
“यावर्षी मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झाली होते आणि नंतर दरवर्षीप्रमाणे मी माझ्या गावी जाणार आहे. गुढीपाडवा साजरा केल्या जो पहिला शनिवार येतो, त्या दिवशी आमच्या गावात ग्रामदेवता जानुबाईची जत्रा असते, त्यासाठी आम्ही सगळे कुटुंबीय गावी जातो. मागच्या वर्षी मी जत्रेसाठी गावी गेले होते…आणि बरोबर ज्या दिवशी देवीची जत्रा होती त्याचदिवशी मला ‘कमळी’ मालिकेसाठी कॉल आला होता. तेव्हा मी मनात इच्छा व्यक्त केली होती की काही करून हे काम मला मिळावं… आणि तेच झालं. म्हणून यावेळी आमच्या गावच्या देवीआईचे आभार मानणार आहे.”
“आमच्याकडे आजी गुढी उभारायची. मी सातारची असल्यामुळे घरी पुरणपोळी, गुळवणी आणि कटाची आमटी असतेच. मला ढोल-ताशा पथकं खूप आवडतात…म्हणूनच शोभायात्रेबद्दल मी कायम खूप उत्सुक असते.” असं कमळीने सर्व चाहत्यांना सांगितलं आहे. याशिवाय अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘कमळी’ मालिका दररोज रात्री ९ वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते. यामध्ये आता लवकरच प्रेक्षकांना अनिकाचं भयानक रुप पाहायला मिळणार आहे. आता कमळी अनिकाचा डाव ओळखण्यात यशस्वी होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर, ‘सनई चौघडे’ फेम अभिनेत्री जुई गोगरी ( आसावरी परब ) गुढीपाडव्याविषयी म्हणाली, “मी दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेत जाते कारण, तिथे आपली माणसं एकत्र आली आहेत असं वाटतं. गुढी पाडवा म्हटलं की गोड जेवण असायलाच पाहिजे, गुळपोळी, श्रीखंड-पूरी, बटाट्याची भाजी, वरण-भात, भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं असा आमच्या घरी एक छान बेत असतो. दरवर्षी मी देवळात जाऊन बाप्पाचा आशीर्वादही घेते.”
