Kamali Serial Zee Marathi Actress Yogini Chouk : ‘कमळी’ मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. त्यामुळे, या मालिकेतील सगळीच पात्रं आता घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. कमळीच्या आईची भूमिका या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक साकारत आहे. कमळी आणि तिच्या आईचं सुंदर नातं प्रेक्षकांना कायमच भावतं, या भूमिकेबद्दल योगिनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

योगिनी चौकच्या पतीचं नाव संदेश बोऱ्हाडे असून, या जोडप्याला सात वर्षांची जुळी मुलं आहेत. यांची नावं आहेत सखी आणि सात्विक. योगिनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘कमळी’ मालिकेत आईची भूमिका साकारण्याबाबत सांगितलं आहे.

अभिनेत्री योगिनी चौक ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “मी कामाला सुरुवात केल्यावर अनेक ठिकाणी ऑडिशन्स देत होते. त्यातील एक ऑडिशन मी ‘कमळी’ मालिकेसाठी दिली होती. सुरुवातीला मी हृषीच्या आईच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण, त्यानंतर झी मधून फोन आला होता की…नाही तुम्ही तिला कमळीच्या आईच्या भूमिकेसाठी विचारा. मग, परत माझी ऑडिशन झाली आणि मी त्यातही सिलेक्ट झाले.”

Kamali Serial Zee Marathi Actress Yogini Chouk
कमळी व सरोज

“माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. कमळीची आई ही भूमिका खरंच खूप छान आहे, मुळात ही कथाच आई अन् लेकीच्या नात्याची आहे. दोघींचे छान सीन्स असतात…मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की, मला ही भूमिका मिळाली. माझीही खऱ्या आयुष्यात दोन मुलं आहेत सखी आणि सात्विक. त्यांच्यामुळे मला आईपण काय असतं हे समजलं, आईचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती मोठं आहे याची जाणीव झाली. त्यामुळे मला कमळीची आई साकारताना सुद्धा त्या भावना समजतात.” असं योगिनीने सांगितलं.

Zee Marathi Actress Yogini Chouk kamali
योगिनी चौक ( Kamali Fame Actress )

दरम्यान, ‘कमळी’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये विजया बाबर आणि निखिल दामले यांची फ्रेश जोडी ऑनस्क्रीनवर एकत्र झळकली आहे. याशिवाय केतकी कुलकर्णी, इला भाटे, आशा शेलार, सारिका नवाथे, सुषमा मुरुडकर, अनिकेत केळकर या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.