Kamali Fame Actress Ketaki Kulkarni : ‘कमळी’ मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम आघाडीवर असते. यामधील कमळी, हृषी, कामिनी, अन्नपूर्णा आजी, रागिणी, अनिका ही सगळीच पात्र घराघरांत पोहोचली आहेत. कमळी अभ्यासात हुशार, नेहमी सत्याने वागणारी आणि समजूतदार मुलगी असते. याउलट अनिका एकदम Gen Z असते. फॅशन, ट्रेंड्स याकडे तिचं सर्वाधिक लक्ष असतं. अनिकाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते. एकंदर काय तर अनिका हे पात्र नकारात्मक असलं तरी काहीसं अल्लड सुद्धा दाखवण्यात आलं आहे.
अनिकाचे ‘गावछाप कमळी’, Hrishhhh ( हृषीला हाक मारणे ) असे बरेच संवाद आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. अनिकाची ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री केतकी कुलकर्णी साकारत आहे. केतकीने बालवयातच तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू केला होता. वयाच्या दहाव्या वर्षी तिने पहिल्यांदा मालिकेत काम केलं होतं. केतकी आता २१ वर्षांची आहे.
वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत केतकीने तिचं खरं वय सर्वांना सांगितलं आहे. लाल रंगाचा शॉर्ट वनपीस ड्रेस, हातात कडा अन् दुसऱ्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन केतकीने खास फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये केतकी खूपच गोड दिसतेय.
केतकीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘२१’ आकडा लिहिला आहे. अभिनेत्रीने तिचा २१ वा वाढदिवस लोणावळ्यात साजरा केला आहे. केतकीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह तिच्या सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मालिकेतील अनिकाची लाडकी ग्रॅनी आजी म्हणजेच कामिनी लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिन्सेस केतकी…तू खूप छान आहेस” याशिवाय सारिका नवाथे, श्रद्धा पवार या कलाकारांनी सुद्धा केतकीला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
केतकीने आजवर मराठीसह हिंदी कलाविश्वात बरंच काम केलेलं आहे. हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. याशिवाय केतकीने बॉलीवूड चित्रपटात सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. केतकी ‘1920: Horrors of the Heart’ या सिनेमात झळकली होती. २०२३ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
