Marathi Actor Adhokshaj Karhade Post : लोकप्रिय मराठी अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे नुकताच बाबा झाला. अभिनेत्याच्या घरी १० फेब्रुवारी २०२६ रोजी गोंडस अशा मुलाचं आगमन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अधोक्षजने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. याशिवाय बाळाचं नाव थोड्याच दिवसात जाहीर करतो असंही त्याने सांगितलं होतं.
अधोक्षज कऱ्हाडे हा लोकप्रिय अभिनेता व कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे. त्यामुळे आता संकर्षण सुद्धा काका झाला आहे. तर, अभिनेत्याने बाळाचं नाव काय ठेवलंय जाणून घेऊयात…
अधोक्षज कऱ्हाडेने त्याच्या बाळाचं नाव ठेवलंय ‘अक्षोभ्य’. लेकाच्या बारशाचे सुंदर फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकांना अक्षोभ्य हे नाव वाचूनच अवघड वाटलंय. तसेच अक्षोभ्यचा नेमका अर्थ काय असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यासाठीच अभिनेत्याने खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्याची पोस्ट, अक्षोभ्य नावाचा अर्थ काय?
लेकराचं बारसं झालं…
नाव – अक्षोभ्य चैताली अधोक्षज कऱ्हाडे.
अर्थ – जो कधीही क्षुब्ध ( अस्वस्थ ) होत नाही. मनाने शांत आणि बुद्धीने स्थिर असणारा… कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणारा… क्षोभ न होणारा, ज्याला विचलित करता येणार नाही असा अक्षोभ्य! अचल, स्थिर, शांत.
अभिनेता पुढे लिहितो, “आता काही जणांना नाव अवघड वाटत असेल…पण कुठलचं नाव अवघड नसतं.. अहो मुद्दा ते नाव घेण्याच्या सवयीचा असतो. म्हणून बघा बरं ५ वेळेला… सहज जमेल. बाकी शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत राहुद्या!”
दरम्यान, अधोक्षजने लेकाचं नाव जाहीर केल्यावर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हृषीचा मोठा भाऊ रोहित इनामदारची भूमिका अधोक्षज साकारतोय. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीमध्ये सुद्धा ‘कमळी’ मालिका आघाडीवर असते.
