Kamali fame Sai Kalyankar husband emotional post: ‘कमळी’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत सतत काहीतरी नवीन घडताना दिसते. आजच्या पीढीचे प्रश्न अनेकदा मांडले जातात. मालिकेतील कमळी निर्भिडपणे येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाताना दिसते. या मालिकेत विजया बाबर, इला भाटे, सई कल्याणकर, निखिल दामले असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत काम करत आहेत.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, कमळी ही गरीब घरातील, खेड्यातील मुलगी आहे. जिला चांगले शिक्षण घेऊन गावातील मुलींसाठी काहीतरी करायचे आहे. त्यासाठी ती मुंबईत आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनिका, तिची आजी कामिनी, आई रागिणी या सगळ्यांनी मिळून कमळीला त्रास दिला. तिला कॉलेजमधून राजन व अन्नपूर्णा आजी यांच्या आयुष्यातून घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, कमळी सगळ्यांना धैर्याने सामोरी गेली. तिला या प्रवासात ऋषी, राजन, निंगी, बंड्या, राधिका वहिनी, अन्नपूर्णा आजी या सगळ्यांची साथ लाभली.
आता कमळीसमोर आणखी एक संकट आले आहे. रितेश सरपोतदार हा विजेता या क्लासचा मालक तिला त्रास देत आहे. त्याच्याविरोधात कमळी व इतर विद्यार्थी आंदोलन करत आहे. कमळीला या लढ्यात अनेकांची साथ लाभत आहे. यामध्ये राधिका वहिनी ही एक आहे. राधिका तिला वेळोवेळी मदत करत असल्याचे पाहायला मिळते.
मालिकेत राधिका हे पात्र अभिनेत्री सई कल्याणकरने साकारले आहे. सईचे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते. तिचा गोड स्वभाव आपलासा करून घेतो. आता मात्र, सई तिच्या पात्रामुळे नाही तर तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सईच्या वाढदिवसानिमित्त तिचे पती डॉ.प्रशांत चव्हाण यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
“आई म्हणून तुझा हा पहिलाच वाढदिवस…”
त्यांनी सई व मुलीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मुलगी नभा व सई यांचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत प्रशांत यांनी लिहिले, “आई म्हणून तुझा हा पहिलाच वाढदिवस आहे. इतक्या प्रेमाने, आपुलकीने तुला आईच्या भूमिकेत पाहणं हा माझ्या आयुष्यातील आनंद आहे. तू आपल्या कुटुंबाला सर्वात सुंदर भेट आहे. आजचा दिवस फक्त आणि फक्त तुझा आहे.”
पुढे त्यांनी लिहिले, “आजच्या या खास दिवशी क्षणभर थांबून तू स्वतःकडे पाहावंस आणि तू जे काही आहेस, जे काही करतेस, त्याचा तुला मनापासून अभिमान वाटावा, हीच माझी इच्छा आहे. तू आमच्या दोघांसाठी किती खास आहेस, तुझ्यावर आमचं किती प्रेम आहे हे तुला नेहमी जाणवत राहो.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! नभा आणि प्रशांत”, असे लिहित प्रशांत यांनी सईला खास शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सई मुलगी नभा व पती प्रशांत यांच्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर वेळोवेळी शेअर करते. आता चाहते तिच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
