Sai Kalyankar reveals her emotional and physical challenges during pregnancy challenges : आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खास आणि भावनिक टप्पा मानला जातो. गरोदरपणात महिलांमध्ये शरीरिक आणि मनसिक असे अनेक बदल होत असतात. या काळात योग्य आहार, काळजी आणि मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो. अनेक अभिनेत्री त्यांचा गरोदरपणाचा अनुभव, प्रवास चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. अशातच आता लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाबद्दल आणि मुलीच्या जन्मानंतर बदललेल्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही काळ अभिनयापासून ब्रेक घेतला. तर काहींनी लगेचच कामाला सुरुवात केली. अशातच आता ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मधील अभिनेत्री सई कल्याणकर हिने तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाबद्दल आणि पहिल्यांदाच अनुभवत असलेल्या मातृत्वाबद्दल सांगितलं आहे. लेकीच्या जन्माच्या अवघ्या काही दिवसांनंतरच सईने पुन्हा मालिकेत काम करायला सुरुवात केली.
लेकीच्या जन्मानंतर लगेच सुरू केलं काम
राजश्री मराठीला मराठी इंडस्ट्रीतील नुकत्याच आई झालेल्या अभिनेत्री अमुता पवार, सई कल्याणकर, मोनिका दबडे आणि कुंजिका यांनी मुलाखत दिली आहे. मुलाखतीत सईने याबद्दल सांगितलं आहे. सई तिच्या मातृत्वाच्या अनुभवाबद्दल आणि गरदोरपणाबद्दल म्हणाली, “नभा अगदीच दोन महिन्यांची आहे. आई झाल्याशिवाय तुम्हाला आईचं मन कळत नाही असं म्हणतात ते खरं असतं. त्या गोष्टी मी अनुभव आहे. गरोदरपणातील दिवस छान गेले. तेव्हासुद्धा मी काम करत होते. खरं सांगायचं तर इतक्यात माझा काम करण्याचा विचार नव्हता, पण गोष्टी तशा जुळून आल्या माझ्या चांगल्या निर्मिती संस्थेमुळे. त्यामुळे मी सगळं आनंदाने अनुभवत आहे. नभासुद्धा मला चांगली साथ देत आहे. आई तिला सांभाळते. सध्या मी आईकडे आहे.”
सई अनुभव सांगत पुढे म्हणाली, “सुरुवातीला मी खूप रडले. मी हे मान्य करते. पहिले १५ दिवस खूप वाईट होते. आपण नेहमी भविष्याचा खूप विचार करतो की आताच असं आहे तर पुढे कसं होईल. हे सगळं मला जमणार आहे का याची मला खूप काळजी वाटली. कारण – सुरुवातील नभाची तब्येत खराब होती. आता ती बरी आहे. आपल्या शरीराचं काय होत आहे हा प्रश्न नसतो आपल्या बाळाचं काय होत आहे हाच विचार असतो.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी कुंजिकाला फोन करायचे. कारण ती तीनच महिने माझ्या पुढे होती. आमच्या गरोदरपणातील अनुभव सारखाच होता. काही तास कळा सोसून आमचं सीझर झालं. मी १४ तास आणि ती १२ तास. पण, शेवटी सी-सेक्शन करुयात असं ठरलं.” सई पुढे म्हणाली, “नवव्या महिन्यात माझी थोडी कुरकुर होत होती. की वजनच वाढलंय. पण मी तिला फोन केला तर ती म्हणाली सई गरोदरपण काहीच नाहीये. खरा अनुभव पुढे येणार आहे.”
