Kamali serial actress Yogini Chowk shares recipe: अनेकांना विविध पदार्थ खायला आवडतात, तर अनेकांना ते स्वत: करून बघायलाही आवडतात. पूर्वीच्या काळी पुस्तके, टीव्हीवर लागणारे खाद्यपदार्थांचे कार्यक्रम यांमधून नवीन पदार्थांची रेसिपी पाहायला मिळत असे.

आता मात्र हे चित्र बदलले आहे. सोशल मीडियामुळे फक्त महाराष्ट्रातील किंवा भारतातीलच नाही तर जगभरातील विविध गोष्टी जाणून घेता येतात. अनेक खाद्यपदार्थांच्या रेसिपी समजतात. विशेष म्हणजे या रेसिपी साध्या आणि सोप्या असल्याने लोक त्या करूनही बघतात.

अनेक कलाकारही काही पदार्थांच्या रेसिपी सांगतात. सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ शेअर करतात. आता अभिनेत्री योगिनी चौकने नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जेव्हा आपल्याला कमी भूक लागलेली असते, तेव्हा काही खाण्याची इच्छा झाली तर अशावेळी कोणता पदार्थ पटकन बनू शकतो, तो पदार्थ कोणता याबद्दल अभिनेत्रीने सांगितले आहे.

मखाना फ्रूट कस्टर्ड कसे बनवायचे?

योगिनीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने मखाना फ्रूट कस्टर्डची ही रेसिपी शेअर केली आहे. एक मोठी वाटी मखाना, अर्धी वाटी काजू आणि त्यावर ५०० मिलिलीटर गरम दूध घालायचे. थोडे केसर घालायचे. गोडव्यासाठी पाच ते सहा बी काढलेले खजूर त्यामध्ये मिसळायचे. हे सगळे मिश्रण तासभर तसेच ठेवायचे.

गरम दुधामुळे मखाने छान फुलतात आणि खजुराचा गोडवाही त्यात उतरतो. केसराचा रंग दुधात मिसळतो. हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करायचे. त्यामध्ये तीन चमचे मध घालून मिक्स करायचे.

दुसऱ्या एका भांड्यात आपल्या आवडीप्रमाणे फळे घ्यायची. अभिनेत्री म्हणाली, “मी सफरचंद, द्राक्षे आणि केळी घेतली आणि त्यामध्ये मिश्रण मिक्स केलं. वरून डाळिंबाचे दाणे, बदामाचे काप घालायचे. अशाप्रकार हा पदार्थ तयार होतो.

मखाना फ्रूट कस्टर्ड तयार झाल्यानंतर योगिनीने तिच्या कुटुंबीयांना ते खाण्यासाठी दिले. तिच्या घरच्यांनी आणि शेवटी तिनेही हा पदार्थ चविष्ट झाल्याचे सांगितले.

अभिनेत्री सध्या कमळी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहे. कमळीची आई म्हणजेच सरोज ऊर्फ गौरी ही भूमिका तिने साकारली आहे. आई आणि मुलीचे गोड नाते प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते.