Kamali Fame Vijaya Babar Diet Plan : विजया बाबर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. विजया सोशल मीडियावर सक्रिय असते आणि त्यामार्फत ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करते.

विजया अनेकदा मुलाखतींमधून तिच्या आवडी-निवडींबद्दल सांगत असते. अशातच तिने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने तिच्या डाएट प्लॅनबद्दल सांगितले आहे. विजया सकाळी न्याहारीमध्ये कोणते पदार्थ खाते, तिच्या दुपारच्या जेवणामध्ये काय असतं आणि फिटनेससाठी ती काय करते याबद्दलची माहिती तिने दिली आहे.

‘असा’ आहे विजया बाबरचा डाएट प्लॅन

मुलाखतीत ‘कमळी’ डाएट प्लॅनबद्दल म्हणाली, “मला खाल्ल्यानतंर ताकद मिळते आणि मी फार फुडी नाहीये; पण सतत सीन करावे लागतात आणि त्यासाठी ताकद राहावी म्हणून माझं खाण्याकडे जास्त लक्ष असतं.” कमळी पुढे सेटवरच्या नियमाबद्दल म्हणाली, “आमच्या सेटवरची चांगली गोष्ट ही आहे की, आमच्या निर्मात्यांचा हा नियमच आहे की, रूममध्ये बसून जेवायचं नाही. सेटवर मोठी जागा आहे, कँटीनसारखी जागा आहे, टेबल वगैरे आहेत. त्यामुळे तिथे जाऊन खातो. त्यामुळे सगळ्यांशी छान बाँडिंग छान झाली आहे.”

Award Banner

‘कमळी’ पुढे लंचमध्ये काय खाते याबद्दल सांगताना म्हणाली, “मी डबा लावला आहे. रोज मला तिथून डबा येतो. मी कडधान्य, नॉन व्हेज सगळं खाते. रोज मी दोन चपात्या आणि थोडासा भात खाते. तसेच सकाळी ब्रेकफास्टला जे असेल ते खाते; फक्त पाव वगैरे खात नाही. मला पौष्टिक जेवण जेवायला आवडतं; पण मला फार बाहेरचं खाणं आवडत नाही. मला जर वाटलं, तर मग मी मागून खाते. मला फार गोड खायला, तेलकट खायला आवडत नसल्यामुळे मी ते खात नाही. मी ठरावीक ठिकाणी मिळणाऱ्या गोष्टीच खाते.”

कमळी पुढे म्हणाली, “माझ्याकडे कायम फळं असतात. मी दिवसाला एक तरी फळ खाईन याकडे लक्ष देते आणि माझी शरीरयष्टीही बरी असल्यामुळे काही खाल्ल्याचा लगेच परिणाम होत नाही.” कमळी पुढे चहा-कॉफीच्या सवयींबद्दल म्हणाली, “मी चहा-कॉफी काहीच घेत नाही. कारण- मला गरम पेय जात नाही. त्यामुळे मी दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करते. चहा वगैरे काही घेत नाही आणि मला सुरुवातीपासूनच ही सवय आहे. मी पाणी, ताक या गोष्टी खूप पिते. त्यातल्या त्यात दुधाची कॉफी पिते. कारण- ती स्कीनसाठी चांगली असते. बाकी माझ्याकडे खूप स्नॅक्स असतात; पण त्यातही सगळं पौष्टिक असतं.”

विजयाच्या डाएटमध्ये ‘हा’ पदार्थ रोज असतो

कमळी पुढे तिच्या संध्याकाळच्या आहाराबद्दल म्हणाली, “मला संध्याकाळी एक सवय आहे की, नाशत्याच्या वेळी मी चिया सीड्स, ओट्स, दूध व मध एकत्रित करून फ्रिजमध्ये ठेवते आणि मग खाताना त्यात फळं टाकून खाते.” हे मी रोज खाते. कमळी पुढे स्वयंपाकाच्या आवडीबद्दल म्हणाली, “मला जेवण बनवण्यात तसा फार रस नाही; पण मला पिझ्झा वगैरे बनवायला आवडतं. मी भाजी वगैरे बनवू शकते; पण मला पोळी वगैरे बनवता येत नाही आणि आवडतही नाही.”