Zee Marathi Kamali Serial Promo : ‘कमळी’ मालिकेत सध्या इनामदारांच्या घरी सगळेजण होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी एकत्र भेटतात हा सीक्वेन्स सुरू आहे. रंगपंचमी साजरी करताना कामिनी आणि अनिका या दोघी मिळून कमळीविरोधात मोठं षडयंत्र रचणार आहेत.
कमळी आणि हृषीचं बॉण्डिंग अनिकाला आवडत नसतं. हृषी फक्त कमळीचं ऐकतो, तिला सगळी मदत करतो…”माझ्या हृषीला कमळीने माझ्यापासून दूर केलंय” असं अनिका तिच्या ग्रॅनी आजीला म्हणजेच कामिनीला सांगते. आता आपल्या नातीला होणाऱ्या त्रासाचा काहीही करून बदला घ्यायचा आणि कमळीला चांगलीच अद्दल घडवायची असा निर्धार कामिनी करते.
इनामदारांच्या घरी सगळेजण रंगपंचमी मोठ्या उत्साहात खेळत असतात. इतक्यात अनिका आणि कामिनी या दोघी मिळून कमळीचे डोळे बंद करतात आणि तिला मनाविरुद्ध थंडाई पाजतात. भेसळ केलेली थंडाई कामिनी कमळीला जबरदस्तीने पिण्यास भाग पाडते. यामुळे कमळीची शुद्ध हरपते. तिला सावरण्यासाठी निंगी पुढे येते. पण, काही वेळाने कमळीला स्वत:हून जाग येते.
काहीही करुन अन्नपूर्णा आजीसमोर कमळीला खोट्यात पाडायचं आणि कमळी ही गौरी-राजनची मुलगी नाहीये असं अन्नपूर्णाला सांगायचं असा प्लॅन कामिनी आणि अनिकाचा असतो. पण, यामध्ये या दोघीही फेल ठरतात. कारण, थंडाईच्या नशेमुळे ‘कमळी’ विनाकारण दुसरीच बडबड करू लागते. आता या सगळ्या परिस्थितीत हृषी, निंगी आणि कमळीची आई तिला सावरण्यासाठी पुढे येणार आहेत.
कमळीला आरामाची गरज आहे हे लक्षात घेऊन, तिच्या राहण्याची व्यवस्था इनामदारांच्या घरीच केली जाते. यावेळी हृषी स्वत:हून कमळीला भेटायला आला होता. इतक्यात गौरी तिथे पोहोचते…यावेळी हृषी तिच्यासमोर कमळी आवडू लागल्याची कबुली देतो. गौरी कामिनीपासून वाचण्यासाठी स्वत:चं नाव आणि ओळख बदलून गावात वावरत असते. सध्या हृषीच्या घरचे कमळीच्या आईला साधना म्हणून ओळखतात. यादरम्यान, हृषी कमळीला भेटण्यासाठी तिच्या खोलीत गेला होता.
लेकीला शुद्ध आल्यावर गौरी स्वत:हून तिला भेटायला जायचं असं ठरवते. यावेळी ‘कमळी’ आपल्या आईसमोर सगळ्या भावना व्यक्त करते…आणि पुढे कमळी सांगते, “आई मला माफ कर…मी यापुढे तुला न सांगता कुठेच जाणार नाही…मी मुंबईला तुला न सांगता आले…खूप त्रास दिला मी तुम्हाला…आई तू आलीस का गं? आबा कुठे आहेत? मला त्यांची खूप आठवण येतेय” लेकीच्या तोंडचे हे शब्द ऐकून गौरीला अश्रू अनावर होतात.

आता खरंच ‘कमळी’ आणि तिच्या आईची भेट होणार की हे एक स्वप्न असेल याचा उलगडा लवकरच होईल. प्रेक्षकांनी कमेंट्स करत हा प्रोमो पाहून हे स्वप्न असल्याचा दावा केला आहे. तर, अनेकांनी कामिनीने दिलेल्या नशेच्या औषधामुळे कदाचित कमळीला दिसत नाहीये असाही अंदाज व्यक्त केला आहे. आता मालिकेचा हा विशेष भाग ११ मार्चला प्रसारित केला जाईल. तेव्हा प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे.
