Kamali Zee Marathi Serial Promo : कमळी मालिकेचे चाहते गेली दीड वर्षं ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण नुकताच सर्वांसमोर उलगडला आहे. अन्नपूर्णा आजीची मोठी नात दुसरी-तिसरी कुणीही नसून स्वत: कमळीच आहे हे सत्य सर्वांसमोर उघड झालेलं आहे. एकीकडे कमळीला हक्काचं घर मिळणार आहे तर, दुसरीकडे कामिनीचा The End झाल्यामुळे अनिका-रागिणीवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
कमळीच आपली खरी नात आहे हे समजल्यावर अन्नपूर्णा आजी तिला सन्मानाने आपल्या घरात आणण्याचा निर्णय घेते. याशिवाय कामिनीचा कपटी चेहरा सुद्धा आता सर्वांना कळून चुकला आहे. कमळीच्या स्वागतासाठी महाजनांच्या घरी खास तयारी करण्यात आलेली आहे. आता लक्ष्मीच्या पाऊलांनी मोठी नात अनेक वर्षांनी घरी परतणार म्हटल्यावर अन्नपूर्णा आजीचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण, दोन जणींच्या चेहऱ्यावर बारा वाजल्याचं पाहायला मिळालं, त्या दोघी म्हणजे अनिका आणि रागिणी.
अनिका रागिणीला म्हणजे स्वत:च्या आईला म्हणते, “आता कायद्यानुसार पाहायला गेलं तर, ती ( गौरी ) बाबाची पहिली बायको आहे आणि तू दुसरी. मी तरी नात आहे म्हणून वाचेन. पण, तुझं काय करायचं? तू जरा विचार कर नाहीतर You Are Done!”
कमळीबरोबर महाजनांच्या घरी गौरीचा सुद्धा गृहप्रवेश होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार कमळीच्या दोन वेण्या आता कायमच्या सुटल्या आहेत. आता तिला महाजनांच्या मोठ्या नातीप्रमाणे राहावं लागणार आहे. याशिवाय साध्याभोळ्या गौरीचा लूकही बदलण्यात आला आहे.

गळ्यात मंगळसूत्र, सुंदर साडी या लूकमध्ये गौरी खूप सुंदर दिसतेय. प्रेक्षकांनी सुद्धा या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत. “फायनली छान ट्रॅक सुरू झाला आहे”, “मस्त प्रोमो आहे…आता कमळी श्रीमंत झालीये प्लीज आता तिचा ड्रेस बदला”, “तिला चांगले कपडे द्या बाबा आता तरी”, “आजीला नात मिळाली पण प्लीज तिचे कपडे-लूक बदला”, “राजकुमारीचा मेकओव्हर करा” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
