Zee Marathi Kamali Serial : ‘कमळी’ मालिकेत सध्या कमळी अन् हृषीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अन्नपूर्णा आजी आपल्या मोठ्या नातीचं हृषीबरोबर लग्न ठरवते. नयनताराकडे त्या स्वत: लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातात. पण, यामुळे हृषीवर एकतर्फी प्रेम करणारी अनिका दुखावली जाते. तिला आणि कामिनीला काहीही करून या साखरपुड्यात विघ्न आणायचं असतं. दुर्दैवाने कामिनीचा प्लॅन यावेळी यशस्वी होणार आहे.
कमळी आणि हृषीचा साखरपुडा समारंभ सुरू असताना कामिनीची एन्ट्री होते. तिच्या हातात लॅपटॉप असतो. नेमके दोघंही एकमेकांना अंगठ्या घालत असताना ती मध्येच येऊन ‘थांबा’ म्हणते, आणि यानंतर खरा ड्रामा सुरू होतो. कारण, कामिनी राजनचा हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ प्ले करते.
अन्नपूर्णा आजीची प्रकृती बरी नाहीये याची माहिती मिळाल्यावर राजन कमळीला महाजनांची मोठी नात होऊन घरात एन्ट्री घे असं सांगतो. खरंतर कमळीच राजनची खरी मुलगी असते पण, सरोजने ( गौरी ) हे सत्य कुणालाच सांगितलेलं नसतं. आता हे सत्य लपवून ठेवल्यामुळे कमळीच्या आयुष्यात मोठा उलथापालथ होणार आहे.
कामिनीने दाखवलेला व्हिडीओ पाहून अन्नपूर्णा आजी हादरते. ती ‘कमळी’ला डोक्यावर हात ठेऊन शपथ घ्यायला लावते आणि विचारते, “सांग तुच आहेस ना… माझी खरी मोठी नात?” आता राजनच आपले खरे बाबा आहेत या सत्यापासून कमळी सुद्धा अनभिज्ञ असते, त्यामुळे आजी अजून दुखावली जाऊ नये या हेतूने कमळी जे काही खरं आहे ते मान्य करते आणि सर्वांची माफी मागते. यावेळी तिला अश्रू अनावर होतात.
कमळीने खरं सांगितल्यावर अन्नपूर्णा आजी तिला कानाखाली मारते आणि घराबाहेर काढते. राजन सुद्धा या परिस्थितीत हतबल होतो. “तू आज माझ्या घरातूनच नाहीतर माझ्या आयुष्यातून सुद्धा कायमची बाहेर निघून जा” असं अन्नपूर्णा आजी मन कठोर करत कमळीला सांगते.
शेवटी कमळी आपलं सामान घेऊन महाजनांच्या घराबाहेर जाते. तिचे डोळे पाणावतात पण, तिच्याकडे काही पर्याय नसतो. या सगळ्यात कमळी-हृषीचा साखरपुडा सुद्धा मोडतो. हा विशेष भाग ३० एप्रिलला रात्री ९ वाजता ‘झी मराठी’वर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘कमळी’चा हा प्रोमो पाहून प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. “किती दिवस हेच सुरूये”, “ही गौरी एवढा वेळ शांत कशी काय बसू शकते… स्वतःच्या मुलीवर एवढा अन्याय होत असताना आई कशी गप्प बसू शकते?”, “का हे असं दाखवता”, “वाटलंच होतं असं काहीतरी होणार”, “खरं सांगा..किती दिवस फसणार” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
