Zee Marathi Kamali Serial Promo : ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण ‘कमळी’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. अन्नपूर्णा आजीची मोठी नात आता महाजनांच्या घरी दणक्यात एन्ट्री घेणार आहे. आपली मोठी नात अजूनही आपल्याला भेटलेली नाहीये यामुळे अन्नपूर्णाला मानसिक धक्का बसतो.

कामिनी, अनिका, रागिणी या तिघीजणी अन्नपूर्णाला रात्रंदिवस टॉर्चर करत असतात. पुढच्या दोन दिवसांत महाजनांची मोठी नात जर घरी आली नाही तर, सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होईल असा डाव कामिनी रचते. या सगळ्या गोष्टींमुळे अनिकाचा माज आणखी वाढतो. ती कॉलेजमध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्यास सुरुवात करते. अनिकाला वेळीच लगाम घातला नाही तर गोष्टी आणखी बिघडू शकतात याचा अंदाज हृषीला सुद्धा असतो.

दुसरीकडे, राजन आपल्या आईला म्हणजेच अन्नपूर्णाला वेळोवेळी धीर देत असतो. आई तुझी मोठी नात नक्की येईल…अन् इतक्यात महाजनांच्या घराबाहेर जल्लोष सुरू होतो. कारण, घरी आलेली असते ‘कमळी राजन महाजन’.

कामिनी, अनिका अन् रागिणी या तिघीही कमळीला पाहून शॉक होतात. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कमळी सर्वांना उद्देशून ठामपणे म्हणते, “मी कमळी राजन महाजन! अन्नपूर्णा आजीची मोठी नात, शब्द आहे आपला माझ्या आजीला जो त्रास देणार त्याला मी सोडणार नाही…”

आता लवकरच मालिकेत कमळीची खरी ओळख उलगडणार असल्याने प्रेक्षक प्रचंड आनंदी आहेत. पण, काही नेटकऱ्यांना हा प्रोमो पाहून वेगळीच शंका आली आहे. अन्नपूर्णा आजीची प्रकृती ठीक व्हावी म्हणून ‘कमळी’ हे सगळं नाटक तर करत नसेल ना? अशा कमेंट्सही प्रोमोवर आल्या आहेत. आता ‘कमळी’ नाटक करणार की, खरंच तिची ओळख सर्वांसमोर उघड होणार हे एपिसोड ऑन एअर झाल्यावर सर्वांसमोर उघड होईल.

‘कमळी’ने जरी महाजनांची मोठी नात असल्याचं नाटक केलं तरीही तिच सगळ्या प्रॉपर्टीची खरी मालकीण असल्याचं सत्य कोणीही नाकारू शकणार नाहीये. आता ‘कमळी’च राजनची मोठी लेक आहे हे कसं समजणार? की, आजीला बरं वाटण्यासाठी कमळीने केलेला हा फक्त एक प्लॅन आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील.

दरम्यान, ‘कमळी’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. मालिकेतील या भन्नाट ट्विस्टमुळे येत्या काही दिवसांत ‘कमळी’चा टीआरपी जबरदस्त वाढण्याची शक्यता आहे.