Zee Marathi Kamali Promo : कमळीने काही दिवसांपूर्वीच महाजनांच्या घरी त्यांची मोठी नात म्हणून एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. पण, आता अनिका कमळीविरोधात दररोज नवनवीन षडयंत्र रचतेय. अनिका कमळीसारखा लूक करून तिच्या नावाने चोरी करतेय, अनेक चुकीच्या गोष्टी घडवून आणतेय. अनिकाने हुबेहूब कमळीसारखा लूक केल्याने, कॅमेऱ्याचं फुटेज चेक केल्यावर सुद्धा सगळ्यांसमोर कमळी चुकीची असल्याचं सिद्ध होईल. एकंदर कमळीचं आयुष्य अनिकामुळे अस्थिर होऊ लागलंय. या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे.

कमळीची आई सरोज ( गौरी ) आणि बाबा राजन हे दोघंही अखेर एकमेकांसमोर येणार आहेत, त्यांची भेट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन आपल्या बायकोचा शोध घेत असतो. तिचं खरं नाव गौरी असतं पण, कामिनीच्या भीतीपोटी एवढे वर्ष गौरी स्वत:ची ओळख लपवून राहत असते. पण, हा संघर्ष अखेर संपणार आहे. रामनवमीच्या दिवशी मंदिरात गौरी-राजन एकमेकांसमोर येतील.

गौरी सर्वांना प्रसाद देत असते. इतक्यात तिच्याही नकळत ती राजनसमोर येते. राजनला पाहताच गौरी पळून जाण्याचा प्रयत्न करते पण, तिला यश येत नाही. अखेर राजन तिला अडवतो आणि त्यांच्या मुलीबद्दल विचारतो.

Award Banner

अनेक वर्षांनी एकमेकांसमोर आल्यावर राजन आणि गौरी या दोघांनाही अश्रू अनावर होतात. पण, कमळीची आई मोठ्या धीराने या कठीण प्रसंगाचा सामना करणार आहे. ती कमळीची खरी ओळख राजनला सांगत नाही. राजन जेव्हा पोटच्या मुलीबद्दल विचारतो, तेव्हा गौरी त्याला स्पष्टपणे सांगते, “या सगळ्यातून आता मी बरीच पुढे निघून आली आहे…झालं-गेलं विसरून जा…कारण, आपली मुलगी आता या जगात नाहीये.”

आता गौरीच्या या बोलण्यावर राजन विश्वास ठेवणार का? कमळीचं विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येईल का? हे लवकरच प्रेक्षकांसमोर उघड होईल. याशिवाय आता ‘कमळी’ अनिकाला तिच्या खोटेपणाचा धडा कसा शिकवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, कॉलेजमध्ये जे चोरीचं प्रकरण घडलंय…यामध्ये सगळेजण कमळीला दोष देणार आहेत. अगदी मुख्याध्यापक सर सुद्धा तिला याप्रकरणी जाब विचारतात. आता कमळी या सगळ्यामागची मुख्य सूत्रधार अनिकाच आहे हे कसं शोधून काढेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.