Kamali Fame Actress Sai Kalyankar : ‘कमळी’ मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. यामध्ये हृषीच्या वहिनीची ( राधिका ) भूमिका अभिनेत्री सई कल्याणकर साकारत आहे. सईने यापूर्वी सुद्धा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. वैयक्तिक आयुष्यात यावर्षी मार्च महिन्यात सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सईच्या लेकीचं नाव आहे नभा. बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

सई कल्याणकर काही महिन्यांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, “मी गरोदर असताना साडेसात महिन्यांनी काम बंद केलं होतं त्यावेळी मला वाटलं होतं…ते लोक माझ्यासाठी थांबणार नाहीत. राधिकाच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट पाहतील. बाळ झाल्यावर मला प्रोडक्शनकडून फोनही आला होता. त्यांनी माझं अभिनंदन केलं…काही दिवसांनी कधी पुन्हा जॉइन करतेस असं विचारलं. पण, मी सांगितलं आता सहा महिने तरी नाहीच. काही दिवसांनी परत फोन आला की, तू म्हणशील तसं आपण काम करुयात. तू फक्त दोन तास दे…तू सांग तुला केव्हा जमेल? तेव्हा आपण शूट करुयात. त्यावेळी मग मी जरा विचार केला. काम आपल्याकडे समोरून येतंय, तर विचार केला पाहिजे. त्याआधी माझं असं होतं की, बाळाला सोडून कामावर जाणं मला जमेल का…सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील. मला थोडा डाऊट होता. पण, समोरून असं कोणीतरी विचारत असेल… प्रोडक्शन हाऊसची टीम आपण मॅनेज करुयात असं म्हणत असेल, तर खरंच ही मोठी गोष्ट आहे.”

अभिनेत्री मोनिका दबाडे सुद्धा या मुलाखतीला उपस्थित होती यावर ती म्हणाली, “खरंच असे प्रोडक्शन हाऊस असले पाहिजेत. प्रेग्नन्सीनंतर अनेकांची कामं थांबतात पण, प्रोडक्शन हाऊस स्वत:हून सहकार्य करत असेल तर मुलींना सुद्धा पाठिंबा मिळेल. जेणेकरून मुलींचं करिअर थांबणार नाही.”

अलीकडेच आपल्या ४ महिन्यांच्या लेकीला घेऊन सई ‘कमळी’ मालिकेच्या सेटवर पोहोचली होती. यावेळी तिचे पती सुद्धा उपस्थित होते. “माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्तींना मी आज माझ्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेले होते. माझी चिमुकली लेक पहिल्यांदाच सेटवर आली होती” असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे. सईच्या चिमुकल्या लेकीसह यावेळी कमळी, निंगी, सरोज यांनी सुंदर फोटो सुद्धा काढले आहेत.

दरम्यान, ‘कमळी’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये विजया बाबर, निखिल दामले, इला भाटे, आशा शेलार या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.