Kamali Serial BTS Shoot Video : कमळी आणि हृषी हे दोघंही गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात आहेत. कमळी तिच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर गावी जायचं असं ठरवते. कमळी ज्या दिवशी गावात पोहोचते…त्याच दिवशी तिच्या आजोबांचं वर्षश्राद्ध असतं. खरंतर, आपले आबा आपल्याला कायमचे सोडून गेलेत…याबद्दल कमळीला काहीच माहीत नसतं. वर्षभराने गावी आल्यावर तिला हे सत्य समजतं. यामुळे ती पूर्णपणे खचते…आपल्या आईने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी काय लपवली, याचा कमळीला फार त्रास होतो.

पण, कमळीचं शिक्षण थांबू नये हा सरोजचा ( गौरी ) एकमेव हेतू असतो. कारण, आबांच्या निधनानंतर कमळी खचणार आणि पुन्हा मुंबईला जाणार नाही हे तिला माहिती असतं. सरोजला जे अपेक्षित असतं तेच घडतं…आबांच्या निधनाबद्दल समजताच कमळी मुंबईला जाण्यास नकार देते.

कमळीचा हा निर्णय समजल्यावर हृषीला खूप मोठा धक्का बसतो. तो कमळीला भेटण्यासाठी तिच्या गावी जाऊन राहतो. याठिकाणी तो अगदी साधं आयुष्य जगतो. याचदरम्यान, घरात ओळख बदलून काम करणाऱ्या साधना मावशी हीच कमळीची खरी आई आहे, हे सत्य सुद्धा हृषीला समजतं. आता हृषीच्या पाठोपाठ अनिका सुद्धा कमळीच्या गावी पोहोचली आहे.

कमळी आणि हृषी कधीही एकत्र येऊ नयेत यासाठी ती प्रयत्न करते. हृषीचे गावचे पोटो ती नयनताराला पाठवून ठेवते, जेणेकरून ती त्याला पुन्हा मुंबईला बोलावून घेईल. गावात अनिकाची एन्ट्री होताच तिच्या अंगावर शेण, माती उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनिकाची मर्सिडिज गाडीही खराब होते, हे सगळं घडल्यावर ती भयंकर संतापते, चिडचिड करते. पण, हा सीन प्रत्यक्ष कसा शूट झालाय याचा एक BTS व्हिडीओ अनिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री केतकी कुलकर्णीने शेअर केला आहे.

ऑफस्क्रीन हा संपूर्ण सीन अनिकाने हसत-खेळत एन्जॉय केला. तिच्या अंगावर शेण उडालंय असा कॉस्टयूम डिझाइन करण्यात आला होता. हृषी वेगात बाईकवरून जातो आणि यामुळे खड्ड्यातील शेण अन् चिखल अनिकावर उडतो असा हा एकंदर सीन आहे. आता हा सीन प्रत्यक्ष कसा शूट झाला, हृषीच्या एन्ट्रीसाठी दोन टेक घेण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

अनिका म्हणजेच केतकी कुलकर्णीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘कमळी’ मालिका ‘झी मराठी’वर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.