Kamali TRP Number One Rank : गेल्या साडेतीन वर्षांपासून टीआरपीमध्ये ‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ मालिका अधिराज्य गाजवतेय. मात्र, या टीआरपीच्या शर्यतीत आता मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ला मागे टाकत आता ‘कमळी’ महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरली आहे. यामुळे कमळीच्या टीमचं संपूर्ण महाराष्ट्रात भरभरून कौतुक करण्यात येत आहे. ‘झी मराठी’ने याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

टीआरपीच्या शर्यतीत या आठवड्यात कोणती मालिका बाजी मारणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर साडेतीन वर्षांचे रेकॉर्ड मोडून काढत ‘कमळी’ संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी मालिकांमध्ये पहिली आली आहे. ‘झी मराठी’ने या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.

“तिने घर केलं प्रत्येकाच्या मनामनांत, ‘कमळी’ ठरली एक नंबर संपूर्ण महाराष्ट्रात! ३.८ TVR सह मराठी मालिकांमध्ये कमळीचा नंबर पहिला” अशी पोस्ट झी मराठीकडून शेअर करण्यात आली आहे.

‘कमळी’ने टीआरपीच्या शर्यतीत एवढं मोठं यश मिळाल्यावर, या मालिकेच्या टीमचं सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “वाह मस्त…”, “आले शंभर… गेले शंभर… कमळी ठरली एक नंबर”, “नंबर वन म्हणजे… ठरलं तर मगला मागे टाकलं कमळीने करून दाखवलं”, “वाह याला म्हणतात टीआरपी” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

‘कमळी’ मालिकेत अभिनेत्री विजया बाबर मुख्य भूमिका साकारत असून, तिच्यासह ईला भाटे, निखिल दामले, केतकी कुलकर्णी, सुषमा मुरुडकर, आशा शेलार हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकत आहेत. आता मालिकेत कमळी आपल्या बाबांचा शोध घेणार असल्याचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. आता कमळी तिच राजन महाजनांची मुलगी आहे हे सत्य केव्हा शोधून काढणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

याशिवाय, झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू झालेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका सुद्धा सायंकाळी सात वाजताची स्लॉट लीडर ठरली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनत्री निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.