Kamali Serial Promo : ‘कमळी’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अन्नपूर्णा आजीची प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. कामिनीने अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीचा मृत्यू झाला असं भासवून देण्यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं. पण, कमळीमुळे ती पुन्हा एकदा तोंडावर पडते. कमळी कामिनीचा डाव उधळून लावते आणि सर्वांसमोर महाजनांची मोठी नात अजूनही जिवंत आहे असं स्पष्ट करते. पण, त्याआधीच अन्नपूर्णा आजीला मानसिक धक्का बसतो. आपली नात आपल्याला कायमची सोडून गेली या विचाराने आजी तणावात जाते.
अन्नपूर्णाची प्रकृती बिघडल्याने घराची सत्ता हातात घेण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं कामिनी अनिकाला सांगते. आता आजी मानसिक धक्क्यात असल्याने पुढच्या दोन दिवसांत सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आणि अन्नपूर्णा कॉलेजची नवीन ट्रस्टी मी होणार असं अनिका मोठ्या रुबाबात कमळीला सांगते.
अनिकाचा हा रुबाब पाहून कमळीला धक्का बसतो. काही करून अन्नपूर्णा आजींना बरं केलं पाहिजे असा ती निर्धार करते. याशिवाय हृषी सुद्धा तिच्या पाठिशी असतो. आता हृषीच्या घरी नाव बदलून काम करणाऱ्या साधना ताई याच कमळीची खरी आई आहेत हे सत्य सर्वांसमोर केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हृषी लवकरच तुझी आणि साधना ताईंची भेट करून देईन असं कमळीला सांगतो. त्यामुळे मायलेकी समोरासमोर आल्यावर बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत.
अन्नपूर्णा आजीची खरी नात दुसरी-तिसरी कोणीही नसून कमळीच आहे हे सत्य मालिकेत केव्हा उलगडणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हे सत्य आता लवकरच सर्वांसमोर येईल असा खुलासा करण्यात आला आहे.
अन्नपूर्णा देवींची नात म्हणून महाजनांच्या घरात कमळी एन्ट्री घेणार आहे. आता कमळीच आपली मोठी नात आहे हे समजल्यावर आजीची प्रतिक्रिया काय असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खुलासा कसा काय होणार? कमळीला या लढाईत कोण साथ देणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.
आता कमळी हीच अन्नपूर्णाची नात आहे या सत्याचा खुलासा ३ आणि ४ फेब्रुवारीला होणार आहे. ही मालिका रोज रात्री ९ वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते.

