Marathi Language Mandatory Rule : येत्या १ मे रोजीपासून राज्यात परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराच दिला आहे. या निर्णयावर काही रिक्षा-टॅक्सीचालकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
सरकारच्या या निर्णयाला काही अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी विरोध दर्शविला आहे आणि संपाचाही इशारा दिला आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या बाबतीत सरकारने घेतलेल्या या निर्णयावर मराठी कलाविश्वातून काही कलाकार प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने यावर आपले मत व्यक्त केले आहे.
कमळी या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री सुषमा जयवंतने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुषमा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती मालिकेतील कलाकारांबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने आता मराठी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णयावर आपलं मत व्यक्त केलेय. तसेच तिने काही प्रश्न विचारले आहेत. अभिनेत्री नेमके काय म्हणालीय? चला जाणून घेऊ…
आपण मराठी बोलायची लाज बाळगतो : सुषमा जयवंत
या व्हिडीओत सुषमा म्हणते, “नमस्कार मी सुषमा जयवंत. एक मुद्दा मी आता बघितला. तुम्ही यूपीवाल्यांना जर मराठी येत नसेल, तर गाडी चालवून देणार नाही. मान्य आहे. खूप छान; पण जेव्हा ते परवाना घ्यायला येतात तेव्हा सरकारकडून किंवा त्यांना जो परवाना मिळतो, तो दिलाच का जातो? तेव्हा का कुणी सक्ती करत नाही. दुसरा प्रश्न, भैय्या जेव्हा भाजी विकत असतो किंवा तो एखादा रिक्षावाल्याला ‘तुम यहां पे आओगे क्या? ये भाजी कितने मे दी?’ हे बोलणारा मराठी माणूस आहे ना, त्याला तुम्ही पहिली सक्ती करा. तुम्ही स्वत: पहिल्यांदा मराठीत बोला. आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला. काय लॉजिक आहे? तुम्ही (प्रेक्षक/नेटकरी) आपल्या मुलांना किती मराठी माध्यमात शिकायला पाठवत आहात?”
सुषमा जयवंतने शेअर केलेला इन्स्टाग्राम व्हिडीओ
‘तू गलत है, तू गलत है’ चाललंय त्यात… : सुषमा जयवंत
पुढे ती पुढे प्रेक्षकांना म्हणाली, “भाषेचं बंधन असणं-नसणं मला कळत नाही. पण हे जे काही ‘तू गलत है, तू गलत है’ चाललंय… त्यात तूपण चुकीचाच आहेस. याच्याबद्दल विचार करा आणि याच्याबद्दल नक्की मत मांडा. मला नक्कीच चर्चा करायला आवडेल…” दरम्यान तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या नेटकऱ्यांनीसुद्धा मते व्यक्त केली आहेत. तिने केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे.
सुषमा जयवंतसह ‘बिग बॉस मराठी ५’मधील धनंजय पोवार, अभिनेता अंशुमन विचारे, अक्षय केळकर, गायक उत्कर्ष शिंदे, अंकिता वालावलकर, तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सचिन गोस्वामी यांसह काही इतर कलाकारांनीसुद्धा या निर्णयावर मते व्यक्त केली आहेत.
