मुंबई आणि परिसरासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, अनेक भागांत शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सवलत कर्मचाऱ्यांना दिली आहे. तर, अनेक मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. मराठी मालिकांचं शूटिंग प्रामुख्याने फिल्मसिटी, मढ आणि ठाण्यात होतं. सध्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून अनेक भागांत पाणी देखील साचलं आहे.
प्रशासनाकडून, ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’ असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे कमळी मालिकेचं आजचं शूटिंग सुद्धा सकाळीच रद्द करण्यात आलं. यानंतर या मालिकेत झळकणारे तीन कलाकार एकत्र आले आणि त्यांनी दुपारच्या जेवणासाठी खास बेत केला.
हृषीची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल दामले, हृषीचा मोठा भाऊ रोहितची भूमिका साकारणारा अधोक्षज कऱ्हाडे आणि अभिषेक कुलकर्णी म्हणजेच सायबा या तिघांनी मिळून आज खास जेवणाचा बेत केला होता.
निखिलने खास पालक भाजी बनवली होती. तर, अभिषेकने घरच्या घरी मसाले भात बनवला होता. याशिवाय अधोक्षजच्या आईने कोबीची भाजी, कांदा कैरीची चटणी आणि पोळ्या बनवून दिल्या होत्या. यासंदर्भात अधोक्षजने खास पोस्ट शेअर केली आहे.
अधोक्षज लिहितो, “आज सकाळी १० वाजता शूटसाठी निघणार होतो, पण ८ वाजताच कळवण्यात आलं, की पावसामुळे आजचं शूट रद्द करण्यात येतंय. कामाच्या लगबगीला अचानक ब्रेक लागल्यामुळे थोडासा हिरमोड झाला, पण थोड्याच वेळात अभिषेकचा फोन आला आणि आमचा वेगळाच प्लॅन झाला. तिघेही ठाण्यातच जवळपास राहत असल्याने त्याच्याच घरी अंगतपंगत (शुद्ध मराठीत pot luck) करायची ठरली. मग काय, निखिलने घरून पालकाची अप्रतिम भाजी करून आणली, अभिषेकने घरी फक्कड मसालेभात केला आणि मला आईने झकास कोबीची भाजी, कांदा कैरीची चटणी आणि पोळ्या असा बेत करून दिला. सगळ्यांनी जमून गप्पा मारत मारत मस्त ताव मारला. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या!”
दरम्यान, अधोक्षजच्या या पोस्टवर कमळी म्हणजेच विजया बाबर खास कमेंट करत म्हणते, “वाह वाह मजाच” याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी, “मस्त बेत झाला”, “मला पण घ्या ना तुमच्यात..”, “वाह एन्जॉय केलंत”, “त्यानिमित्ताने तुमच्या बिझी शेड्युल मधून निवांत छान गप्पा टप्पा मारता येतील”, “अचानक ठरलेला बेत मस्तच” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर दिल्या आहेत.
