Kamali Upcoming Twist: ‘कमळी’ मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील कमळी, हृषी, कामिनी, अन्नपूर्णा आजी, रागिणी, राजन, अनिका, निंगी ही सगळीच पात्रे सतत लक्ष वेधून घेतात.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अनिकाचे हृषीवर प्रेम आहे. त्याचे प्रेम मिळवण्यासाठी ती अनेक प्रयत्न करते. कमळी व हृषीमध्ये जवळीक होऊ नये म्हणून ती अनेक कट कारस्थाने करताना दिसते. कमळीला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आजी कामिनीच्या मदतीने तिने आजपर्यंत कमळीच्या विरुद्ध अनेक कट कारस्थाने केली आहेत. मात्र, कमळी प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर पडली आहे. यामध्ये तिला अन्नपूर्णा आजी, हृषी, निंगी यांची वेळोवेळी मदत झाली.

याबरोबरच हृषी कमळीच्या प्रेमात पडला आहे. कमळीच्या बाजूने फक्त मैत्री होती. हृषीला ती चांगला मित्र मानते. आता मात्र तीसुद्धा ऋषीच्या प्रेमात पडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

कमळी हृषीच्या प्रेमात पडली अन्…

झी मराठी वाहिनीने ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी वर्गात बसली आहे, ती जेव्हा पुस्तकाचे पान उलटते तेव्हा तिला हृषीचा फोटो दिसतो. ती दुसरे पान उघडते तिथेही तिला हृषीचा फोटो दिसते. तिला सगळीकडे हृषीचा भास होऊ लागतो. कमळी स्वत:शीच म्हणते, “प्रत्येक ठिकाणी मला तुम्हीच दिसत आहात. हे काय होतंय मला?” हे म्हणताना कमळी लाजते. एकटीच हसते. जेव्हा ती फळ्यावर काहीतरी लिहिण्यासाठी जाते तेव्हा अक्षरे हवेत तरंगल्यासारखी दिसतात. हृषी दरवाजातून आत येतो, त्यानंतर त्यांच्यातील काही रोमँटिक क्षण पाहायला मिळतात. शेवटी कमळी म्हणते, “खुळ्यावाणी झालं आहे, कमळीच्या मनाला हृषी सर तुम्ही भिडलाय.” या दरम्यान ‘तुझ्या पिरतीचा चढलाय ज्वार, टांगा पलटी आणि घोडं फरार’, हे गाणं ऐकायला मिळत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “खुळ्यावानी चढला कमळीला रंग इश्काचा, मनाला लागला तिच्या नाद हृषी सरांचा”, अशी कॅप्शन दिली आहे.

हृषीचे जरी कमळीवर प्रेम असले तरी त्याची आई नयनतारा व त्याचा भाऊ रोहित यांना कमळी आवडत नाही. हृषीने कमळीपासून दूर राहावे, हे त्यांनी हृषीला सतत बजावले आहे. आता कमळी हृषीसमोर खरंच त्याच्या प्रेमाची कबुली देणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.