Kamali upcoming twist: ‘कमळी’ या मालिकेत कमळीने नुकतेच रितेश सरपोतदार या क्लास मालकाचा खोटेपणा सर्वांसमोर उघड केल्याचे पाहायला मिळाले. त्यासाठी तिने आंदोलन केले. महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी तिला पाठिंबा दिला.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे कामिनी, रागिणी आणि अनिका यांनी नेहमीप्रमाणे कमळीच्या विरोधात कट कारस्थान करत रितेशला मदत केली. पण, तरीही या संपूर्ण प्रकरणात कमळीला यश मिळाले. कमळीच्या आयुष्यात सतत काहीतरी घडताना दिसते. कमळी ही राजन व गौरी यांची मुलगी आहे. राजन गौरीला सोडून परदेशात गेला होता. मात्र, त्यादरम्यान कामिनीने स्वत:च्या मुलीचे म्हणजेच रागिणीचे लग्न राजनबरोबर लावून देण्यासाठी गौरीला व तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गौरी तिच्या वडील व मुलीसह दुसऱ्या गावात राहू लागली.

गौरी जिवंत असल्याचं सत्य अखेर कामिनीला कळणार

जेव्हा अनेक वर्षांनंतर कामिनीला कमळीच गौरी व राजनची मुलगी असल्याचे समजले, तेव्हा तिने कमळीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गौरीच्या लक्षात आले आणि कमळीला बाजूला सारले, तिला गोळी लागली. त्यानंतर गौरीचे निधन झाले आहे, असा सर्वांचा समज झाला होता. मात्र, काही काळानंतर गौरी व कमळीची भेट झाली होती. त्यावेळी गौरीला मधल्या काळातील काही आठवत नसल्याचे लक्षात आले. तिला खूप वर्षांआधीचे म्हणजेच कमळी लहान होती, तेव्हाचे आठवते. जरी गौरी सापडली असली तरी कमळीने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. आता कामिनीसमोर गौरी जिवंत असल्याचे सत्य येणार असल्याचे, समोर आलेल्या प्रोमोत दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने, कमळी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, राजनच्या हातात श्रीगणेशाची मूर्ती आहेत. सगळेजण आनंद साजरा करत आहेत. अन्नपूर्णा आजी, कमळी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तर, अनिका, कामिनी, रागिणी डान्स करत असल्याचे दिसत आहे. तितक्यात निंगी गौरीला घेऊन तिथे येते. कामिनीला गौरी दिसते. गौरी जिवंत असल्याचे सत्य तिच्यासमोर येते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “गौरी जिवंत असल्याचं अखेर कामिनीला कळणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता कामिनी समोर आल्यानंतर गौरीला सगळं काही आठवणार का, तसेच राजन व गौरीची भेट होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.