Kamali Upcoming Twist: ‘कमळी’ या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. कमळी, अन्नपूर्णा आजी, राजन, गौरी ऊर्फ सरोज यांच्या आयुष्यात मोठे चढ-उतार आल्याचे दिसत आहे.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या कमळी या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, कामिनी ही मोठ्या प्रमाणात कट-कारस्थान करते. तिच्याबरोबर तिची मुलगी रागिणी, तिची नात अनिकादेखील या सगळ्या कारस्थानामध्ये तिच्याबरोबर सहभागी असतात.
कामिनीने स्वत:च्या मुलीचे म्हणजेच रागिणीचे लग्न राजनबरोबर लावून देण्यासाठी अनेक कारस्थाने केली. राजन परदेशात असताना त्याची पत्नी गौरी आणि तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. मुलीसाठी गौरीने ओळख बदलली आणि शेजारच्या गावात राहू लागली. कमळीला तिच्या वडिलांबद्दल काहीही माहीत नाही.
कमळी स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गावाहून मुंबईत आली. यादरम्यान, ती अनेकदा राजन आणि अन्नपूर्णा, तसेच कामिनी, रागिणी, अनिका यांना भेटली. पण, राजन आणि अन्नपूर्णा ज्या कमळीचा शोध घेत होते, ती तीच आहे, हे कोणालाच समजले नाही.
कामिनीदेखील गौरी आणि तिच्या मुलीचा शोध घेत होती. काही दिवसांपूर्वी तिला गौरी ऊर्फ सरोज सापडली. तिच्याबरोबर कामिनीने कमळीच्या वयाच्या एका मुलीला किडनॅप केले आणि त्यांचा अपघात घडवून आणला. या अपघातात त्या मुलीचा मृत्यू झाला; तर सरोज दवाखान्यात असल्याचे पाहायला मिळाले. ज्या नातीचा इतक्या दिवसांपासून शोध सुरू होता, त्या नातीचे निधन झाले आहे हे जेव्हा अन्नपूर्णाला समजले तेव्हा तिला मोठा धक्का बसला.
‘कमळी’ मालिकेत ट्विस्ट
झी मराठी वाहिनीने कमळी मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अन्नपूर्णा दु:खात आहे. याच संधीचा फायदा घेत कामिनी तिथे येते. ती म्हणते की, तुझ्या मोठ्या नातीचा मृत्यू झाला आहे.
अन्नपूर्णा आजी देवीसमोर बसली आहे. ती देवीसमोर हात जोडते आणि ती म्हणते, “आई तुळजाभवानी, माझ्या डोळ्यासमोर त्या पोरीने प्राण सोडला.” कामिनी तिथे येते आणि म्हणते, “वहिनी तुझी मोठी नात देवाकडे गेलेली आहे. तू आता तुझी सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावे कर.” त्यानंतर कामिनी, अनिका आणि रागिणी तिथून निघून जाते. अन्नपूर्णा आजी बेशुद्ध पडते. कमळी तिथे पोहोचते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, ज्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिच्या निधनानंतर प्रार्थना सभा सुरू आहे. तिथे कमळी येते आणि ती म्हणते की, राजन काका तुमची मुलगी जिवंत आहे. या फोटोमध्ये असणारी मुलगी ही तुमची मुलगी नाही. ते ऐकल्यानंतर राजनला धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘कामिनीचा डाव कमळी उधळून लावणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता कमळीच्या या खुलाशानंतर कामिनी नेमकं काय करणार, कमळीच खरी नात असल्याचे अन्नपूर्णाला कधी कळणार, मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
