Kamali Upcoming Twist: ‘कमळी’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. गावाकडून मुंबईसारख्या शहरात आलेली कमळी ही कष्टाळू आहे. प्रत्येक संकटावर मात करत ती तिची स्वप्ने पूर्ण करते.

सध्या मालिकेत राजन आणि अन्नपूर्णा त्यांच्या मोठ्या नातीचा शोध घेत असल्याचे दिसत आहे. राजन आणि गौरी यांचे लग्न झाले होते. त्यांना मुलगी झाली. त्यानंतर राजन परदेशात नोकरीसाठी गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा गौरी व तिचे कुटुंब त्याला सापडले नाही.

खरेतर कामिनीने गौरी व तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गौरी तिच्या वडील आणि मुलीसह दुसऱ्या गावात राहण्यासाठी गेली. तिने तिची ओळख बदलली. स्वत:चे नाव सरोज असे ठेवले. तिच्या मुलीला राजनच्या कुटुंबापासून दूर ठेवले. गौरीला राजनच्या आयुष्यातून बाजूला करून कामिनीने स्वत:च्या मुलीचे राजनशी लग्न लावून दिले.

सरोज मुलीच्या काळजीमुळे मुंबईत आली. कामिनीपुढे कमळी येऊ नये, याची तिला काळजी होती. दुसरीकडे कामिनी तिच्या शोधात होती. आता सरोज कामिनीला सापडली. त्यानंतर कामिनी, तिची मुलगी रागिणी आणि तिची नात अनिका मोठं कारस्थान करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘कमळी’ मालिकेत ट्विस्ट

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर कमळीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अन्नपूर्णाला फोन येतो. एक मुलगी बोलत असते.ती म्हणते, “मी तुमची मोठी नात आहे. माझ्या आईचं नाव गौरी आहे”, ते ऐकून अन्नपूर्णाला आनंद होतो. ती राजन आणि तिच्या नवऱ्याला म्हणते, “माझी मोठी नात येणार. आपल्याला तिच्या स्वागताची तयारी करायला हवी.” एकीकडे अन्नपूर्णाला जरी आनंद झाला असला तरी फोनवर बोलणारी तिची मोठी नात नसून तिची धाकटी नात अनिका होती. ती फोन करून तिच्याशी बोलत होती.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सरोजच्या तोंडावर पट्टी बांधली आहे. तिला एका गाडीतून नेण्यात येते. ती गाडी एका ठिकाणी जाऊन धडकते. त्यानंतर कामिनी अन्नपूर्णाला फोन करतो. आवाज बदलून ती तिला सांगते की एक अपघात झाला आहे. एक बाई आहे आणि तिच्याबरोबर सतरा-अठरा वर्षाची एक मुलगी आहे. ते ऐकल्यानंतर अन्नपूर्णाला धक्का बसतो.

राजन आणि अन्नपूर्णा तिथे पोहोचतात. सरोज बेशुद्ध झालेली असते. तिला दवाखान्यात नेण्यात येते. कमळीदेखील त्यांच्याबरोबर येते. मात्र, कमळी सरोजला भेटू शकत नाही. त्यामुळे तिच्या आईचा अपघात झाला आहे. हे तिला माहित होत नाही. प्रोमोमध्ये पुढे राजन बेशुद्ध सरोजच्या शेजारी बसल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अन्नपूर्णा आजी आणि कमळी यांच्यात कामिनी निर्माण करू शकेल का दरी?”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, कमळीच अन्नपूर्णाची मोठी नात असल्याचे सत्य केव्हा समोर येणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.