Kamali Upcoming Twist: मालिकेतील नायक-नायिका जितके लक्ष वेधून घेतात, तितकेच त्यांना त्रास देणारे खलनायक-खलनायिका लक्ष वेधून घेतात. खलनायक काहीतरी कारस्थान करतात, काहीतरी मिळवण्यासाठी इतरांना त्रास देतात. तर नायक-नायिका त्यातून मार्ग काढतात, त्रास देणाऱ्यांना धडा शिकवतात.

असेच काहीसे कमळी या मालिकेत पाहायला मिळते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या कमळी या मालिकेत अनेक पात्रे आहेत. त्यांचे वेगवेगळे स्वभाव आणि त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीत फरक पाहायला मिळतो.

कमळी ही छोट्या गावातून मुंबईत आलेली मुलगी आहे. तिला चांगले शिक्षण घेऊन तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. मात्र, जेव्हापासून ती मुंबईत आली आहे, तेव्हा पासून तिला सतत कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनिका, कामिनी, रागिणी हे सगळे मिळून तिला त्रास देतात. तिला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी, तिला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू नयेत आणि तिच्यात व ऋषीमध्ये जवळीक वाढू नये यासाठी त्या सतत प्रयत्न करतात.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच वार्षिक परीक्षा झाली. त्या परीक्षेत कमळीला चांगले मार्क मिळू नयेत, म्हणून अनिकाने अनेक प्रयत्न केले. मात्र, कमळी येणाऱ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडली. आता मालिकेचा एक प्रोमो लक्ष वेधून घेत आहे.

निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंची एन्ट्री

झी मराठी वाहिनीने कमळी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला ऐकायला मिळते की आव्हानांना भिडणाऱ्या बेडधडक कमळीचा आज निकाल लागणार. कमळी छत्रपती शिवाजी महारांजाच्या मूर्तीसमोर जाऊन उभी राहते. ती हात जोडून म्हणते, “ज्याच्यासाठी गाव सोडून मुंबईत आलो, त्याच्या पहिल्या पायरीचा आज निकाल लागतोय.आशीर्वाद असू द्या.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अनिका म्हणते,”कमळी आता तुझा प्रवास संपणार. एक वर्ष आमच्या डोक्यावर नाचलीस. आता तू नापास होऊन थेट गावाला निघून जाणार.” पुढे शिक्षणमंत्री विश्वभंर राजेशिर्के यांची एन्ट्री होते. ते निकालाची घोषणा करतात. ते म्हणतात, “मुंबई विद्यापीठात पहिल्या आलेल्या त्या विद्यार्थिनीचं नाव आहे….” सर्वांच्या चेहऱ्यावर निकाल जाणून घेण्याची उत्सुकता दिसते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “खुद्द शिक्षणमंत्री जाहीर करणार महाराष्ट्राचा महानिकाल”, अशी कॅप्शन दिली आहे.

झी मराठी वाहिनीवरील शुभ श्रावणी मालिकेत विश्वभंर राजेशिर्के हे शिक्षणमंत्री आहेत. ही भूमिका अभिनेते लोकेश गुप्ते यांनी साकारली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, निकालात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.