छोट्या पडद्यावरील मालिकांचं शूटिंग दिवसभर जवळपास १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे दैनंदिन मालिकांमध्ये काम करणारे कलाकार दिवसातील अनेक तास सेटवर एकत्र घालवतात. शूटिंगदरम्यान, एकत्र सीनची तयारी करताना, गप्पा मारताना, एकत्र जेवताना आणि एकमेकांना आधार देताना नकळत काही खास नाती तयार होतात. ही नाती फक्त सहकलाकार म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर आयुष्यभर जपावी अशी सुंदर मैत्री या कलाकारांमध्ये तयार होते. सेटवरील बॉण्डिंग, आठवणी, सुख-दुःखाचे क्षण आणि एकमेकांना दिलेला आधार या सगळ्यांमुळे या कलाकारांचं नातं अधिक घट्ट होत जातं.

फ्रेंडशिप दिनानिमित्त ‘झी मराठी’वरील तुमच्या लाडक्या कलाकारांनी सेटवर जुळलेल्या त्यांच्या खास मैत्रीबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. कोण आहे त्यांचा सर्वात जवळचा मित्र किंवा मैत्रीण, त्यांची मैत्री कशी फुलली आणि शूटिंगदरम्यानचे कोणते क्षण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, याबद्दल या कलाकारांनी आठवणी शेअर केल्या आहेत.

‘कमळी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर मालिकेच्या सेटवर जुळलेल्या मैत्रीबद्दल म्हणाली, “सेटवरील सगळ्याच कलाकारांशी माझी खूप छान मैत्री झाली आहे. मात्र, साक्षी (निंगी) आणि निखिल (हृषी ) यांच्याशी माझं खास बॉण्डिंग तयार झालं आहे.”

साक्षी (निंगी) आणि निखिल (हृषी ) शूटिंगला नसले की सेटवर काहीतरी कमी असल्यासारखं विजयाला ( कमळी ) वाटतं. मालिकेच्या शूटिंगदरम्यान सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत आहे. कारण, कमळी आणि निंगी या दोघीही पडद्यावर बेस्ट फ्रेंड्स आहेत, आणि ऑफस्क्रीन सुद्धा त्यांची मैत्री तशीच आहे. एकमेकींच्या सुख-दुःखात त्या कायम सोबत असतात. साक्षीला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा ती गोंधळते, तेव्हा तिला धीर देणं आणि तिचा आत्मविश्वास वाढवणं या गोष्टी विजया आवर्जून करते.

kamali
कमळी फेम कलाकार

तर, निखिलबद्दल बोलताना विजया म्हणते, “त्याच्या विनोदांमुळे सेटवरील वातावरण नेहमीच आनंदी राहतं. निखिलबरोबर बिर्याणी आणि डाएट कोकचा आस्वाद घेत गप्पा मारायच्या…मला हे खूप आवडतं. या मैत्रीमुळेच आमच्या शूटिंगचा सेट माझ्यासाठी जणू माझं दुसरं घरंच आहे.”