Zee Marathi Kamali Serial Promo : आपली मोठी नात अजूनही घरी परतलेली नाही, आपण अपघातात तिला कायमचं गमावलं या विचाराने अन्नपूर्णा आजीला मानसिक धक्का बसतो. ती पूर्णपणे तणावात जाते…कोणाशी काहीच बोलत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अन्नपूर्णाने काहीही करून तिच्या मोठ्या नातीला भेटणं आवश्यक असतं. म्हणूनच राजन या सगळ्या प्रकरणात ‘कमळी’ची मदत मागतो.

आता ‘कमळी’ने अन्नपूर्णा आजीची मोठी नात म्हणून महाजनांच्या घरी प्रवेश घेतला आहे. खरंतर, कमळीच गौरी आणि राजनची मुलगी असते. पण, हे सत्य अद्याप कोणासमोरही आलेलं नाहीये. सध्या फक्त आजीला बरं वाटावं आणि राजन काकांनी मदत मागितल्यामुळे कमळीने महाजनांची मोठी नात म्हणून त्यांच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

पण, ‘कमळी’च्या एन्ट्रीनंतर अनिका आणि कामिनीच्या चेहऱ्यावर बारा वाजतात. पहिली गोष्ट म्हणजे अनिकाला आता संपूर्ण प्रॉपर्टी मिळणार नाहीये. याशिवाय कामिनीचा महाजनांच्या मोठ्या नातीला जीवे मारण्याचा आणि अन्नपूर्णाचा छळ करण्याचा प्लॅनही आता फसला आहे.

अन्नपूर्णा आजी झोपलेली असताना कामिनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते. पण, यात तिला यश मिळत नाही. कारण, कमळी वेळेत येऊन कामिनीचा हात धरते आणि तिला रंगेहाथ पकडते. अचानक कमळीला आलेलं पाहून कामिनी दचकते. कमळी तिला चांगलंच सुनावत म्हणते, “एवढे दिवस माझ्या वाटेत येत होतीस तेव्हा मी गप्प राहिले पण, आता माझ्या आजीला त्रास दिलास तर मी गप्प बसणार नाही. तिची ही नात कायम तिच्यासाठी ढाल बनून उभी राहील.”

याशिवाय कमळी अनिकाला सुद्धा घरातील मदतनीसांबरोबर वाईट वागताना, त्यांच्याशी अरेरावी करून बोलताना पाहते. हे दृश्य पाहून ती अनिकाला सुद्धा चांगलंच धारेवर धरते. कमळी अनिकाला दम देत म्हणते, “आता तुझी मनमानी चालणार नाही…या घरची एकुलती एक तू नाहीयेस…आता मी सुद्धा आहे. तुझी मोठी बहीण. तसंही मोठ्या बहिणीचं कामच असतं धाकट्यांना शिस्त लावायची.” अनिकाने तिच्या खोलीत काचेचा ग्लास फोडलेला असतो. हे सगळं कमळी तिला साफ करायला सांगते.

त्यामुळे कमळी-राजनच्या प्लॅनमुळे का होईना आता महाजनांच्या घरी सत्तापालट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘कमळी’ आणि राजन मिळून हे नाटक किती दिवस सुरू ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेटकरी हा प्रोमो पाहून प्रचंड खूश झाले आहेत. “कमळी फायर आहे”, “एक नंबर प्रोमो”, “खूपच छान कमळी”, “कमळी एक नंबर कामिनीला चांगलं सरळ कर” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.