Zee Marathi Kamali Serial Promo : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेत सुद्धा नायिका दणक्यात शिवजयंती उत्सव साजरा करणार आहे. याचा विशेष प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांचे संस्कार डोळ्यासमोर ठेऊन कमळी तिच्या जीवनातील प्रत्येक पाऊल उचलत असते असं मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मध्यंतरी चुकीच्या मार्गावर जाऊ पाहणाऱ्या अन्नपूर्णा महाविद्यालयातील काही मुलांना कमळीने महाराजांचे संस्कार, त्यांची शिकवण काय होती याची जाणीव करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी कमळी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे यावर्षी शिवजयंतीचा उत्सव देखील नायिका दणक्यात साजरा करणार आहे.

कमळी शिवजयंती साजरी करण्यासाठी थेट रायगडावर पोहोचली आहे. यावेळी कमळी प्रेक्षकांना आवाहन करत म्हणते, “अखंड हिंदुस्थानाचे भाग्यविधाते…छत्रपती शिवाजी महाराज! चला नतमस्तक होऊन महाराजांची स्फूर्ती घेऊयात अन् शिवजयंती दणक्यात साजरी करुयात!”

‘कमळी’ मालिकेचा हा जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षक सुद्धा भारावून गेले आहेत. “याला म्हणतात मालिका…जय शिवराय”, “जगात भारी प्रोमो आहे आता आतुरता फक्त १९ फेब्रुवारीची”, “कमळी महाराष्ट्राची नंबर वन मालिका व्हावी…कारण खरंच संपूर्ण टीम खूप मेहनत घेतेय” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘कमळी’ मालिकेत शिवजयंती विशेष भाग १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान प्रसारित केले जातील. “चला रायगडावर साजरा करूयात शिवजयंतीचा सुवर्णदिन, सोबतीला असेल ‘कमळी’ छत्रपती शिवरायांची वाघीण!” असं कॅप्शन झी मराठीने या प्रोमोला दिलं आहे.

आता कमळीच्या शिवजयंती विशेष भागात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. नेटकऱ्यांनी या मालिकेच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.